अखेर टेस्लाची भारतात एन्ट्री! बंगळुरात नाही तर पुण्यात घेतले ऑफिस; भाडे एवढे, लोकेशन कुठे असेल...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 12:13 PM2023-08-03T12:13:50+5:302023-08-03T12:14:54+5:30
Tesla in Pune: गेल्या वर्षी टेस्ला बंगळुरूत गेल्याचे वृत्त आले होते. टेस्लाने तिकडे संशोधन केंद्र स्थापन करण्याची तयारी केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यावेळी टेस्ला भारतात येणार असल्याचे नक्की झाले होते. आता टेस्लाने एक पाऊल पुढे टाकले आहे. गेल्या वर्षी टेस्ला बंगळुरूत गेल्याचे वृत्त आले होते. टेस्लाने तिकडे संशोधन केंद्र स्थापन करण्याची तयारी केली होती. परंतू, आता टेस्लाने पुण्यात भले मोठ्ठे ऑफिस उघडण्याची तयारी सुरु केली आहे.
Tesla India Motor and Energy Pvt Ltd ने पुण्यातील विमाननगर भागातील पंचशील बिझनेस पार्कमध्ये ऑफिससाठी जागा भाड्याने घेतली आहे. टेस्ला कंपनीचे सर्व अधिकारी याच कार्यालयात काम करतील, आणि हळूहळू व्यवसाय सुरू करतील. या कार्यालयात सर्व प्रकारच्या बैठका होणार असल्याचे बोलले जात आहे.
रिअल इस्टेट अॅनालिटिक्स फर्म CRE मॅट्रिक्सनुसार टेस्लाने ६० महिन्यांसाठी ही जागा घेतली आहे. यासाठी महिन्याला 11.65 लाख रुपये भाडे देणार आहे. तसेच 34.95 लाख रुपये अनामत रक्कम देणार आहे. पंचशील बिझनेस पार्क सध्या निर्माणाधीन आहे. या पार्कचा आकार 10,77,181 चौरस फूट एवढा आहे.
टेस्लाच्या उपकंपनीने पंचशील बिझनेस पार्कमधील बी विंगच्या पहिल्या मजल्यावर 5,580 चौरस फूट कार्यालयाची जागा घेतली आहे. टेबलस्पेस टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडसोबत हा करार करण्यात आला आहे. त्याचे भाडे 1 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणार आहे. विमानतळापासून हे कार्यालय तीन किमी दूर आहे. कॉम्प्लेक्समध्ये पाच कार पार्क आणि 10 बाईक पार्किंग देण्यात आले आहेत. 2021 मध्ये टेस्लाची भारतीय उपकंपनी बेंगळुरू येथे रजिस्टर झाली होती. त्यानंतरची मोठी घडामोड आहे. भारतीय बाजारात टेस्लाच्या पहिल्या कारची किंमत सुमारे 20 लाख रुपये असू शकते.