भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी बस लडाखमध्ये सुरू होणार! जाणून घ्या सविस्तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 11:37 AM2023-08-22T11:37:11+5:302023-08-22T11:52:13+5:30
भारतातील सर्वात मोठी ऊर्जा उत्पादक कंपनी एनटीपीसीच्या (NTPC) नेतृत्वाखाली शहरातील आंतर-शहर सेवेसाठी लेह प्रशासनाला पाच हायड्रोजन इंधन सेल बसेस पुरवणार आहे.
नवी दिल्ली : भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी बस सेवा केंद्रशासित प्रदेश लडाखच्या रस्त्यांवर सुरू होणार आहे. जी पर्यावरणास अनुकूल वाहतुकीच्या नवीन युगाची सुरुवात करणार आहे. भारतातील सर्वात मोठी ऊर्जा उत्पादक कंपनी एनटीपीसीच्या (NTPC) नेतृत्वाखाली शहरातील आंतर-शहर सेवेसाठी लेह प्रशासनाला पाच हायड्रोजन इंधन सेल बसेस पुरवणार आहे.
हायड्रोजन फ्युएल सेल बसेसचा मुख्य उद्देश पर्यावरणाच्या दृष्टीने वाटचाल करण्याचा आहे. राज्यातील उच्च उंचीवरील, थंड वाळवंटातील सार्वजनिक रस्त्यांवर या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची पहिली व्यावसायिक चाचणी घेऊन पहिली हायड्रोजन फ्युएल सेल बस सेवा लेहमध्ये सुरू होणार आहे. दरम्यान, एनटीपीसी या भारतातील सर्वात मोठ्या वीज उत्पादक कंपनीने हा प्रकल्प हाती घेतला आहे. तसेच, संस्थेने शहरांतर्गत वाहतुकीसाठी पाच हायड्रोजन इंधन सेल बस लेह सरकारकडे सोपवल्या आहेत.
सरकारी कंपनीने बसेसला इंधन देण्यासाठी ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी इंधन केंद्र आणि 1.7 मेगावॅटचा कॅप्टिव्ह सोलर प्लांट देखील बांधला आहे. लेह प्रशासनाने पायाभूत सुविधांसाठी शहरातील 7.5 एकर जमीन भाड्याने दिली आहे. एप्रिल 2020 मध्ये, अशोक लेलँडला प्रति युनिट 2.5 कोटी रुपये या दराने बसेस उपलब्ध करून देण्यासाठी जागतिक स्वारस्य अभिव्यक्ती जारी करण्यात आली. हायड्रोजन फ्युएल सेल बसमधील प्रवासाचा खर्च सध्या वापरात असलेल्या 9-मीटर डिझेल बसच्या बरोबरीचा असणार आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज सुद्धा करत आहे हायड्रोजन बसेसची चाचणी
दररम्यान, ऊर्जा परिवर्तन करण्यासाठी एक महत्त्वाचे तंत्रज्ञान मानले जाणारे हायड्रोजन इंधन सेल अद्याप विकासाच्या टप्प्यात आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये हायड्रोजनवर चालणाऱ्या बसचीही चाचणी घेतली जात आहे. लवकरच भारतातील सार्वजनिक महामार्गांवर व्यावसायिक हायड्रोजन इंधन सेल बसचा वापर केला जाईल. या तंत्रज्ञानाची चाचणी पहिल्यांदा 11,500 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या आणि कमी ऑक्सिजनच्या दुर्मिळ वातावरणात केली जाणार आहे. त्याची खरी परीक्षा हिवाळ्यात असेल जेव्हा लेहचे सरासरी तापमान उणे 20 अंश सेल्सिअसच्या खाली जाईल. थंड हवेसह हे कमी तापमान मशीनचे नुकसान करू शकते.