विद्युत कार टेस्लाची किफायतशीर आवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 06:41 PM2017-07-31T18:41:46+5:302017-07-31T18:42:14+5:30
टेस्लाच्या महत्त्वाकांक्षी व लोकांचे लक्ष लागून राहिलेल्या बहुचर्चित मॉडेल – ३ या ईकारचे लाँचिंग झाले आहे. एक परवडणारी कार म्हणून या ई-कारकडे पाहिले जात आहे.
कॅलिफोर्नियातील फ्रेमॉन्ट येथील फॅक्टरीमध्य़े विद्युत कार म्हणजे ई-कार तयार करणार्या टेस्ला या कंपनीने आपल्या सेदान पद्धतीच्या विद्युत मोटारीच्या एका किफायतशीर अशा आवृत्तीचे लाँचिंग केले. पहिल्या तीस ग्राहकांना या मोटारी ज्या टेस्ला मॉडेल ३ म्हणून ओळखल्या जात आहेत, त्यांचा ताबाही दिला. वीजेवर चालणाऱ्या मोटारी म्हणजे वीजेद्वारे चार्ज केल्यानंतर त्या मोटारीतील बॅटरीद्वारे ऊर्जा पुरवठा केला जाऊन त्यांचा वापर करण्याचे हे तंत्रज्ञान आहे. पर्यावरणाच्यादृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्य़ा व प्रदूषणाला आळा घालणाऱ्या या ई-कार सध्या जगाचे लक्ष वेधून घेत आहेत. भारतामध्येही काही वर्षांमध्ये फक्त अशाच इ-कार्सचे उत्पादन होईल व सर्वच कारमालक याच प्रकारच्या मोटारी वापरतील, अशा अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. थोडक्यात सांगायचे तर पेट्रोल, डिझेल,सीएनजी, एलपीजी या इंधनावर चालणाऱ्या मोटारी आता कालबाह्य होण्याचे दिवस जवळ येऊ लागले आहेत, नेमका तो काळ कधी येईल ते भारतामध्ये तरी सांगणे तूर्तास तरी कठीण आहे.
टेस्लाचे हे ई कारचे मॉडेल ३ आहे तरी काय हे पाहू. टेस्लाच्या या मोटारीने विद्युत कारच्या क्षेत्रामध्ये साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. अखेर ती सादर झाली. ३५ हजार डॉलर किंमतीची ही टेस्लाची मॉडेल ३ म्हणजे किफायतशीर असली तरी नेत्रदीपक आहे. एका चार्जिंगमध्ये ती ३५० किलोमीटर अंतर कापू शकेल, असे टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इऑन मस्क यांनी उद्घाटनाच्यावेळी सांगितले. या आधीची दोन मॉडेल्स ही तशी महाग होती. हे मॉडेल परवडणारे असल्याचे घोषित करण्यात आल्याने लोकांचे लक्ष लागले होते. या टेस्ला मॉडेल ३ मध्ये डॅशबोर्ड मोकळा असून त्यामध्ये एअर कंडिशनचे व्हेन अंतर्भूत आहेत. मोटारीच्या चालकाला माहितीसाठी एका स्क्रीनवर वेग, आरपीएम, किलोमीटर वा मैलाची आकडेवारी,आदी सुविधाही आहेत हॅण्डलींगलाही सुलभ असणारी ही मॉडेल ३ टेस्ला कंपनीच्यादृष्टीने एक महत्त्वाकांक्षी योजनाच म्हणायला लागेल. याआधीच्या महाग असलेल्या मॉडेल एक्स व एस यांच्या तुनलनेत सुविधा चांगल्या स्वरूपात देण्यात आल्या असून ती कमी किंमतीमध्ये असल्याने जे लोकांना हवे होते, ते सारे यात आहे, अशा आशयाचे मनोगत कंपनीने व्यक्त केले आहे. मास मार्केट कार असे वर्णन या मॉडेल३ बाबत केले जात आहे.कार लॉंच होते काय व ४८ तासांमध्ये २ लाख ५० हजारचे बुकींगही या मॉडेलसाठी केले जाते काय, अशी ही लक्षवेधक व पर्यावरणपूरक कार असून वाहनक्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते या कारने ई-मोटारीला मुख्य मार्गप्रवाहाकडे नेले आहे. झटपट चार्ज होऊ शकणारी रचना, ५.६ सेकंदात ताशी ६० मैलाचा (सुमारे १०० किलोमीटर) वेग पकडण्याची ताकद, कमाल वेग २१० किलोमीटर, पाच प्रवाशांना आरामात बसण्याची आसनव्यवस्था, १४ घनफूट इतकी जागा पुढे व मागे सामान ठेवण्यासाठी उपलब्ध, बॅटरी अधिक चार्जिंगची असणारे यातील मॉडेलही उपलब्ध, स्टॅण्डर्ड बॅटरी ही एका चार्जिंगमध्ये ३५५ किलोमीटर इतके अंतर कापू शकेल. तर ४४ हजार डॉलरची किंमत असलेल्या याच मॉडेलमधील बॅटरीमुळे ५०० किलोमीटर इतके अंतर एका चार्जिंगमध्ये कापता येईल. टेस्लाची लांबी ४६९४ मिमी, तर रुंदी १८४९ मिमी,उंची १४४३ मिमी इतकी असून २८७५ मिमी व्हील बेस आहे तर वजन १६१० किलोग्रॅम आहे. रेअर व्हील ड्राईव्ह प्रकारातील ही मोटार असून फोरव्हीलमध्येही मागणीप्रमाणे ती केली जाणार असल्याचे वृत्त आहे. एकंदर टेस्ला- मॉडेल ३ च्या आगमनामुळे आता विद्युत कारचा जमाना सुरू झाला असल्याचे मानले जात आहे. हा जमाना भारतात यायला मात्र अजून किती काळ जाईल, त्यासाठी पायाभूत सुविधा या मोटारीच्यादृष्टीने कशा तयार केल्या जातील, त्यावरच भारतातील ई-कार्सचे भवितव्यही खऱ्या अर्थाने अवलंबून आहे.