कार स्वच्छतेसाठी फ्लोअरिंग लॅमिनेशचा पर्याय उत्कृष्ट पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 02:57 PM2017-08-17T14:57:47+5:302017-08-17T14:58:05+5:30
कारच्या अंतर्गत फ्लोअरिंगसाठी लॅमिनेशन्सचा एक अतिशय चांगला प्रकार विकसित झालेला आहे. त्यामुळे कारच्या देखभालीमधील स्वच्छतेच्या कामात चांगलाच उपयोग होऊ शकतो. विशेष म्हणजे पावसाळ्यामध्ये लॅमिनेशन अधिकच उपयुक्त ठरते.
कार नवी घेतली की अनेक अतिरिक्त साधन घ्यावी लागतात. सर्व साधने काही कार उत्पादक कंपनीकडून मिळतात असे नाही व मिळाली तरी काहीवेळा मनासारखीही वाटत नाहीत किंवा त्यांच्या किंमतींबाबत साशंकता वाटते. काहीशा जास्त किंमतीची वसुली कार उत्पादक कंपनी किंवा त्यांच्या वितरकाकडून होत असते. त्याला काही व्यावसायिक कारणेही आहेत. या अतिरिक्त अॅक्सेसरीजमध्ये कारच्या फ्लोअरिंगला लॅमिनेशन करण्याची एक पद्धत गेल्या काही काळामध्ये चांगलीच विकसित झाली आहे. पूर्वी मुंबईतील प्रीमिअर कंपनीच्या कार असणारे टॅक्सीवाले जुन्या कारच्या सुशोभिकरणासाठी व स्वच्छतेच्या कामातील सोयीसाठी कारपेट टाकत असत. कालांतराने पारदर्शक प्लॅस्टिकचा वापर केला जाऊ लागला. ते प्लॅस्टिक जाडजूड असे व त्याला बसवण्यासाठी चक्क चिकटवण्याचा प्रकार किंवा स्क्रू लावून ते बसवण्याची पद्धत वापरली जात असे. त्यानंतर कारची मागणी वाढली व त्यानुसार विविध कंपन्यांच्या वेगवेगळ्या मॉडेल्सनी बाजारात स्थान पक्के केले. या कारसाठी मात्र लॅमिनेशचा वापर अधिक चांगल्या पद्धतीने होऊ लागला आहे. वेलक्रो द्वारे कारमधील मूळ फ्लोअरिंग मटेरियलला हे लॅमिनेशन बसवले जाते. त्या कारच्या आतील बाजूला असलेल्या प्लॅस्टिकच्या वा मेटलच्या पट्ट्यांमध्ये ते खोचले जाते. हे नवे मटेरिअल ही कृत्रिम लेदरचेही मिळते, जे तुम्हाला ओल्या फडक्याने पुसता येऊ शकते आणि पाणी सांडले तरी त्यावर ते तसेच राहाते, खाली झिरपून तुमच्या गाडीच्या पत्र्याला खराब होऊ दिले जात नाही. ते पाणी पुसता येते वा टिपून घेता येते. त्यामुळे गाडीमध्ये शीतपेय वा अन्य काही द्रवपदार्थ वा ओलसट पदार्थ सांडले गेले तरी साफ करणे सोयीचे जाते व स्वच्छही चांगल्या पद्धतीने करता येते. लॅमिनेशनचा हा फायदा नक्कीच चांगला आहे, यात संशय नाही.
हे लॅमिनेशन करणाऱ्या कारागीरांना वा दुकानदारांनाही आता कारच्या मॉडेलनुसार करायचे याची जाणीव इतकी आहे की, कारच्या मॉडेलनुसार ते तयार केलेले आहे किंवा त्याचे आकारही तयार स्वरूपात असल्याने ते कारागीरांना झटकन हाताळणे सोपरे जाते. विशेष करून फोम लेदरमधील चांगल्या दर्जाचा वापर यासाठी केला जातो. ते किती हवे आहे, ते कापायला कसे लागेल, याची चिंता आता कारागीरांना नसल्याने एखाद्या कंपनीची नवी कार बाजारात आली की बहुधा लगेचच त्याच्या फ्लोअरिंगतचा आकार लक्षात घेऊन संबंधित व्यावसायिक त्याचा आकार आरेखितही करून टाकतात. यामुळे कमीवेळेत ते बसवता येते.
पावसाळा, उन्हाळा वा हिवाळा या तीनही ऋतूंमध्ये या लॅमिनेशनचा फायदा होतो. पावसाळ्यात विशेष करून फ्लोअरिंग अति ओलसर राहाण्याची शक्यता असते. कारमध्ये सतत बसण्याच्या व उतरण्याच्या क्रियेमुळे पावसाळ्यामध्ये आतमध्ये पाणी तुमच्या पादत्राणाला लागून येत असते. रेनकोट, छत्री ठेवणे यामुळेही फ्लोअरिंग भिजत असते. पण लॅमिनेशेनमुळे सर्वसाधारण कापडाच्या व धाग्याधाग्यांच्या मटेरिअलपासून बनवलेल्या फ्लोअरिंगवर पावसामुळे होणारे हे दुष्परिणाम होत नाहीत. ओल फारसा न राहाण्याची शक्यता कारच्या देखभालीमध्ये त्रासदायक ठरत नाही. आसनांच्या नटबोल्टच्या ठिकाणीही पाणी राहून गंजण्याचे वा खराब होण्याचे प्रकार यामुळे होत नाहीत, कारण ते लॅमिनेशनच्या खाली गेलेले असतात. ओला व सुका कचरा-धूळ साफ करायलाही सोपे जाते. उन्हाळ्यात हे लॅमिनेशन गार होत नाही की थंडीत ते थंडही फार होत नाही. त्याचे वातावरण तुमच्या कारला सोयीस्कर असते. वातानुकूलीत स्थितीत ते पायाला अतिथंड वाटत नाही. तसेच पायाला काही बोचणारी वस्तू चुकून पादत्राणांना लागून आत आली तरी जटकन जाणवते व तुम्ही ती काढून टाकू शकता. मोठ्या किंमतीच्या कारमध्ये काही कंपन्यांकडून अशा प्रकारची अतिउच्च दर्जाची लॅमिनेशन्स कारच्या अंतर्गत रंगढंगाप्रमाणे दिलीही जाऊ लागली आहेत. चांगल्या देखभालीसाठी, टिकावूपण वाढण्यासाठी, स्वच्छतेसाठी कारच्या फ्लोअरिंगमधील ही लॅमिनेशन्स नक्कीच उपयुक्त व स्वीकार्य ठरावीत असे म्हणता येईल.