Ford Exit: कार आहेत का? फोर्डला कधी नव्हे तो तुफान प्रतिसाद; सर्व्हिस सेंटरवरही वाहनांच्या रांगा
By हेमंत बावकर | Published: September 15, 2021 11:45 AM2021-09-15T11:45:47+5:302021-09-15T11:47:28+5:30
Ford got huge call for Car: दिवसाला एखादी गाडी बुक झाली तर झाली नाहीतर कोणी ढुंकूनही फिरकत नव्हते. काहीही फिचर नसलेल्या गाड्या फक्त इंजिन आणि परवडते म्हणून लोक घेत होते. पण गेल्या तीन-चार दिवसांत जे घडले त्याची उत्तरे देऊन कर्मचारी दमले.
- हेमंत बावकर
फोर्डने भारतात उत्पादन थांबवून (Ford quit) उत्पादित झालेल्या कारची विक्री होईपर्यंत शोरुम उघडे असतील अशी घोषणा केली होती. प्रत्यक्षात फोर्डकडे फक्त 1000 गाड्याच शिल्लक होत्या. परंतू त्या गाड्या कमी किंमतीत, डिस्काऊंटमध्ये मिळतील म्हणून लोकांनी कंपनी बंद होत असली तरी देखील फोनावर फोन केल्याने फोर्डला जाता जाता मोठा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र होते. तसेच सर्व्हिस सेंटरही बंद होतील, मग लांब जावे लागेल म्हणून कोरोना काळात टाळाटाळ करणाऱ्या कार मालकांनीही तिकडे धाव घेतली आहे. (FORD got huge call asking car availability after India Exit. Customers looking for discount on Ford cars.)
Ford Exit Story: फोर्डने तीन महिन्यांपासूनच तयारी केलेली; कर्मचारी 'भुलले', फसले, अडकले
तसा फोर्डचा सेल मध्यम होता. दिवसाला एखादी गाडी बुक झाली तर झाली नाहीतर कोणी ढुंकूनही फिरकत नव्हते. काहीही फिचर नसलेल्या गाड्या फक्त इंजिन आणि परवडते म्हणून लोक घेत होते. गेल्या 10 वर्षांत फोर्डने ज्या गाड्या लाँच केलेल्या त्यातच काहीसे बदल करून त्यांचे फेसलिफ्ट कंपनी लाँच करायची. यामुळे तरुण ग्राहक वर्ग फोर्डकडे वळत नव्हता. चांगल्या फिचरच्या कार कशा असतात याचे उदाहरण किया मोटर्स, एमजी मोटर्सने दिले आहे. परंतू फोर्डला काही ते पटले नाही. देशभरात सध्या फोर्डचे 10 लाख ग्राहक आहेत.
एवढे ग्राहक असूनही फोर्डने एक्झिट घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या ग्राहकांना कंपनीने पुढील 10 वर्षे सेवा देण्याची हमी दिली आहे. या घोषणेने कुठे भीती तर कुठे आनंद व्यक्त होत होता. दुसऱ्या दिवशीपासून फोर्डच्या शोरुमना गाड्या उपलब्ध आहेत का, याचे शेकडो फोन येऊ लागले. धक्कादायक बाब एवढा प्रतिसाद फोर्डच्या गाड्यांना गेल्या 20 वर्षांत कधीही मिळाला नव्हता. या प्रकारामुळे सारे सेल्स कर्मचारी नाही असे उत्तर देऊन भांबावले. आमचा स्टॉक संपला असे उत्तर शोरुममधून मिळत होते. हे लोक कमी किंमतीत, डिस्काऊंटमध्ये गाडी मिळतेय का हे पाहत होते.
सर्व्हिस सेंटर बंद होण्याची भीती
ज्या लोकांनी फोर्डच्या कार घेतल्या आहेत आणि कोरोनामुळे जे लोक सर्व्हिस करण्यास चालढकल करत होते, किंवा ज्यांच्या गाड्यांमध्ये छोटे मोठे प्रॉब्लेम होते ते लोक जवळचे सर्विहस सेंटर बंद होईल या भीतीने सर्विहस सेंटरवर रांगा लावू लागले होते.