FORD Ecosport चे उत्पादन चेन्नई प्लांटमध्ये पुन्हा सुरु झाले; हे आहे कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 02:57 PM2021-09-19T14:57:16+5:302021-09-19T14:58:03+5:30
Ford India Exit, EcoSport production started: फोर्ड चेन्नईमध्ये इकोस्पोर्ट बनविते. फिगो आणि अस्पायर मॉडेल सानंदमध्ये बनविण्यात येत होते. फोर्ड इंडियाने भारतातील उत्पादन बंद करण्याची, प्रकल्प बंद करण्याची घोषणा 9 सप्टेंबरला केली होती.
Ford Ecosport Production: दहा दिवसांपूर्वीच भारतातील उत्पादन बंद करत असल्याची घोषणा करणाऱ्या फोर्डने चेन्नईच्या प्लांटमध्ये कॉम्पॅक्ट एसयुव्ही Ford Ecosport चे उत्पादन पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे कारण म्हणजे जवळपास 30000 कार कंपनीला निर्यात करायच्या आहेत. ही ऑर्डर कंपनीला 2021 च्या अखेरपर्यंत पूर्ण करायची आहे. (Ford EcoSport production restarted in Chennai plant for exports.)
फोर्ड इंडियाने भारतातील उत्पादन बंद करण्याची, प्रकल्प बंद करण्याची घोषणा 9 सप्टेंबरला केली होती. सोबतच चेन्नईमधील वाहन आणि इंजिन निर्मिती 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत बंद करण्यात येणार आहे. दुसरीकडे सानंदमधील इंजिन निर्मिती सुरु ठेवण्यात येणार आहे. आशिया, मध्य पूर्व आणि आफ्रिकी बाजारात विकल्या जाणाऱ्या रेंजर मॉडेलला ही इंजिन पुरविली जाणार आहेत.
फोर्ड चेन्नईमध्ये इकोस्पोर्ट बनविते. फिगो आणि अस्पायर मॉडेल सानंदमध्ये बनविण्यात येत होते. इकोस्पोर्ट ही कार भारतीय बाजारपेठेसह निर्यातीसाठीही उत्पादित केली जात होती. फोर्ड इंडियासारख्या मोठ्या कंपनीने भारतीय बाजारातून बाहेर पडणे हे मेक इन इंडिया मोहिमेला मोठा धक्का मानला जात आहे. याशिवाय शेवरले (जनरल मोटर्स), युएम मोटारसायकल, हार्ले डेविडसन सारख्या कंपन्यांनी आधीच भारतात उत्पादन करणे बंद केले होते.
फोर्डच्या या निर्णयामुळे जवळपास 5300 कर्मचाऱ्यांचे भविष्य संकटात आले आहे. चेन्नईमध्ये 2700 कायमस्वरुपी कर्मचारी आणि 600 कंत्राटी कर्मचारी काम करत होते. तर सानंदमध्ये 2000 एवढे कर्मचारी काम करत होते. दुसरी संख्या फोर्ड डीलर, शोरुम आणि सर्व्हिस सेंटरच्या कर्मचाऱ्यांची आहे. त्याबाबत अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही कदाचित येण्याची शक्यताही नाही. कारण पुण्यात तीन चार डीलरशीप आणि सर्विहस सेंटरपैकी एकाच डीलरने सर्व्हिस सेंटर सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इतरांनी बंद केले आहे.