फोर्ड भारतात परततेय? एंडेव्हरनंतर इकोस्पोर्ट एसयुव्हीचे डिझाईन भारतात केले रजिस्टर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 13:44 IST2024-04-02T13:44:12+5:302024-04-02T13:44:18+5:30
Ford Ecosport Come Back in India: फोर्डने एंडेव्हर आणि इकोस्पोर्ट या दोन एसयुव्हींचे डिझाईन भारतात रजिस्टर केल्याने लवकरच पुन्हा वापसी होण्याची शक्यता जोर धरू लागली आहे.

फोर्ड भारतात परततेय? एंडेव्हरनंतर इकोस्पोर्ट एसयुव्हीचे डिझाईन भारतात केले रजिस्टर
तब्बल २० वर्षांनी फायद्यात आलेली फोर्ड कंपनी काही वर्षांपूर्वी भारतातून चालती झाली होती. भारतातील दोन्ही प्लांट कंपनीने विकायला काढले होते. अशातच एक प्लाँट विकून दुसऱ्या प्लांटची विक्री रोखल्याने फोर्ड पुन्हा भारतात येणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. कंपनीच्या प्रवक्त्यांनी अद्याप याबाबत कंपनीने माहिती दिलेली नाही, अशी प्रतिक्रिया दिलेली असली तरी फोर्डने एंडेव्हर आणि इकोस्पोर्ट या दोन एसयुव्हींचे डिझाईन भारतात रजिस्टर केल्याने लवकरच पुन्हा वापसी होण्याची शक्यता जोर धरू लागली आहे.
फोर्ड सर्व्हिस सेंटरच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनीही दबक्या आवाजात वृत्त आहे परंतु तसे काही संकेत नसल्याचे म्हटले आहे. अशातच फोर्डच्या इकोस्पोर्ट या पाच सीटर एसयुव्हीचे नवे डिझाईन व्हायरल झाले आहे. याचेच डिझाईन फोर्डने भारतात पेटंट करवले होते.
इकोस्पोर्टचे नाव बदलून कंपनी नवीन रुपात ही पाच सीटर एसयुव्ही भारतात लाँच करण्याची शक्यता आहे. ही एसयुव्ही फोर्ड कंपनी भारतात तयार करून ती परदेशातही विकत होती. परदेशातील ऑर्डर पूर्ण करण्यासाठी कंपनीने भारतातील विक्री थांबवूनही वर्षभराने उत्पादन बंद केले होते.
फोर्डची नवी इकोस्पोर्ट एसयुव्ही ही वेगळ्यात लुकमध्ये येत असून एलईडी डीआरएलमुळे ती आकर्षक दिसत आहे. तसेच तिचा मस्क्युलर लुकही बदलण्यात आला आहे. बंपरमध्येही बदल करण्यात आला आहे. एकंदरीतच नव्य़ा दमाने फोर्ड पुन्हा भारतीय बाजारात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे झाले तरी ही कार टाटा नेक्सॉन, मारुती ब्रेझा, ह्युंदाईच्या क्रेटाला टक्कर देणार आहे. परंतु, प्रश्न हा आहे की दोनदा जाऊन परत भारतात येणाऱ्या कंपनीवर विश्वास ठेवणार तरी कोण आणि किती? फोर्ड लव्हर या कंपनीवर पैसा टाकतील परंतु अन्य ग्राहक या कंपनीवर पुन्हा विश्वास ठेवतील का, असाही प्रश्न उभा असणार आहे.