फोर्डचा यू-टर्न...! चेन्नईतील प्लांट चालू करणार; सध्यातरी निर्यातीची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 02:51 PM2024-09-14T14:51:37+5:302024-09-14T14:52:08+5:30
तीन वर्षांपूर्वी भारतीय बाजारपेठ कायमची सोडून गेलेली फोर्ड ही अमेरिकन कंपनी पुन्हा भारतात परतत असल्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.
तीन वर्षांपूर्वी भारतीय बाजारपेठ कायमची सोडून गेलेली फोर्ड ही अमेरिकन कंपनी पुन्हा भारतात परतत असल्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. फोर्डने चेन्नईचा प्लांट विक्रीला काढला होता. परंतू, सर्व व्यवहार होत असतानाचा अचानक पाय मागे खेचले होते. यावेळीच फोर्ड परत येत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. अखेर फोर्डच्या बड्या अधिकाऱ्यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेत सध्यातरी फोर्डचा प्रकल्प वाहनांची निर्यात करण्यासाठी सुरु करणार असल्याचे जाहीर केले आहे.
या घोषणेमुळे फोर्डने प्रकल्प बंद केले तेव्हा नोकरी गेलेल्यांचे रोजगार पुन्हा उपलब्ध होणार आहेत. फोर्डच्या आंतरराष्ट्रीय बाजार समूहाचे अध्यक्ष के हार्ट यांनी लिंक्डइन पोस्टद्वारे भारतात परतत असल्याची माहिती दिली. कंपनीने तामिळनाडू सरकारला इरादा पत्र (LOI) सादर केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
फोर्ड मोटर कंपनी आणि तामिळनाडू सरकार यांच्यात अनेक उच्चस्तरीय चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. जागतिक बाजारपेठेला पुरवठा करण्यासाठी तामिळनाडूच्या उत्पादन कौशल्याचा लाभ घेण्याचा फोर्डचा मानस आहे.
फोर्डने गुजरातमधील सानंद येथे असलेला प्रकल्प टाटाला विकला होता. जागतिक स्तरावर तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ सोडण्याचा निर्णय फोर्डने घेतला होता. दुसराही प्रकल्प विकण्याच्या प्रयत्नात फोर्ड होती. परंतू, अचानक हा प्रकल्प विकण्याचा प्लॅन रद्द करण्यात आला होता. आता फोर्ड सध्या निर्यातीसाठी या प्रकल्पाचा वापर करणार असली तरी भविष्यात भारतातही पुन्हा एकदा फोर्ड एन्ट्री करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.