Petrol Diesel Price cut: 1 डिसेंबरपासून पेट्रोल, डिझेलच्या किंमती १४ रुपयांनी घसरणार? कंपन्या फायद्यात आल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 12:18 PM2022-11-30T12:18:38+5:302022-11-30T12:19:05+5:30
Fuel Price cut: काही दिवसांपूर्वी पेट्रोलियम मंत्र्यांनी पेट्रोलवर नफा मिळण्यास सुरुवात झाल्याचे म्हटले होते, परंतू डिझेलवर प्रति लीटरमागे ४ रुपयांचा तोटा होत असल्याचे म्हटले होते.
कच्च्या तेलाच्या किंमती कमालीच्या घसरल्या आहेत. यामुळे येत्या काळात पेट्रोल, डिझेलच्या किंमतींत १४ रुपयांची घट होऊ शकते. कच्च्या तेलाच्या किंमती जानेवारीपासूनच्या सर्वात कमी पातळीवर आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल ८१ डॉलर प्रति बॅरलवर आले असून अमेरिकी क्रूड ऑईल ७४ डॉलर प्रति बॅरलवर आले आहे.
या घसरणीमुळे भारतीय रिफायनरींसाठी कच्च्या तेलाची किंमत सरासरी ८२ डॉलरवर आली आहे. मार्चमध्ये हाच दर 112.8 डॉलर होता. या प्रमाणे गेल्या ८ महिन्यांत कच्च्या तेलाचे दर ३१ डॉलर्स म्हणजेच २७ टकक्यांनी कमी झाले आहेत.
एसएमसी ग्लोबलनुसार कच्च्या तेलाच्या किंमतीत १ डॉलरने घट झाली तर रिफायनरींना प्रति लीटरमागे ४५ पैशांची बचत होते. या हिशेबाने पेट्रोलडिझेलचे दर १४ रुपयांनी कमी व्हायला हवेत. ही कपात एकाचवेळी होण्याची अपेक्षा नाही, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या सध्याच्या किमतींनुसार, कच्च्या तेलाची भारतीय बास्केट प्रति बॅरल सुमारे $85 असायला हवी होती, परंतु ती $82 च्या आसपास आली आहे. या किंमतीनुसार रिफायनरी कंपन्यांचे प्रति बॅरल (159 लीटर) शुद्धीकरणावर सुमारे 245 रुपये वाचत आहेत.
काही दिवसांपूर्वी पेट्रोलियम मंत्र्यांनी पेट्रोलवर नफा मिळण्यास सुरुवात झाल्याचे म्हटले होते, परंतू डिझेलवर प्रति लीटरमागे ४ रुपयांचा तोटा होत असल्याचे म्हटले होते. परंतू, आताच्या दरानुसार डिझेलही फायद्यात आल्याचे दिसत आहे. कारण तेव्हापासून कच्चे तेल १० टक्क्यांनी घसरले आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर नक्कीच कमी होतील, पण त्यासाठी थोडा वेळ लागेल. तेल आयातीपासून शुद्धीकरणापर्यंतचे चक्र ३० दिवसांचे असते. आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमती कमी झाल्यानंतर एक महिन्यानंतर त्याचा परिणाम दिसून येतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.