इंधन दरवाढीचा वाहन विक्रीला फटका; आठ टक्क्यांनी घसरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 06:02 AM2022-08-06T06:02:36+5:302022-08-06T06:02:51+5:30
तीनचाकी-व्यावसायिक वाहनांना पसंती. वाहन वितरकांची संघटना ‘फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन’ने (फाडा) ही माहिती जारी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेलच्या किमती सतत वाढत असल्याने तसेच सीएनजीच्या किमतीत ऐतिहासिक वाढ झाल्याने त्याचा वाहन विक्रीला फटका बसला आहे. प्रवासी वाहने, दुचाकी वाहने आणि ट्रॅक्टर यांच्या नोंदणीत झालेल्या घसरगुंडीमुळे जुलैमध्ये वाहनांच्या किरकोळ विक्रीत वार्षिक आधारावर ८% घट झाली आहे.
वाहन वितरकांची संघटना ‘फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन’ने (फाडा) ही माहिती जारी केली आहे. त्यानुसार, जुलै २०२२मध्ये वाहनांची एकूण किरकोळ विक्री १४,३६,९२७ इतकी राहिली. जुलै २०२१मध्ये हा आकडा १५,५९,१०६ होता. प्रवासी वाहनांची विक्री ५ टक्क्यांनी घटली. या महिन्यात २,५०,९७२ प्रवासी वाहने विकली गेली.
दुचाकीला किती फटका?
n जुलै २०२२मध्ये दुचाकी वाहनांची विक्री ११%नी घटून १०,०९,५७४ वाहनांवर आली.
n गतवर्षी ११,३३,३४४ दुचाकी वाहने विकली गेली. जुलै २०२२मध्ये ५९,५७३ ट्रॅक्टर विकले गेले.
n जुलै २०२१मध्ये ८२,४१९ ट्रॅक्टर्सची विक्री झाली होती. ट्रॅक्टर विक्रीतील घसरण २८% आहे.
कोणत्या वाहनांची विक्री वाढली?
जुलै २०२२मध्ये तीनचाकी आणि व्यावसायिक वाहनांची विक्री अनुक्रमे ८० टक्के आणि २७ टक्के वाढली आहे. या महिन्यात ५०,३४९ तीनचाकी, तर ६६,४५९ व्यावसायिक वाहने विकली गेली.
कधी वाढणार विक्री?
नागपंचमीपासून सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. या काळात वाहनांची विक्री वाढेल, अशी अपेक्षा ‘फाडा’ने व्यक्त केली आहे.
जुलैमध्ये विक्रीचे आकडे घटले असले तरी वाहनांची नवनवी मॉडेल बाजारात उतरविली जात आहेत. विशेषत: कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीत वृद्धीमुळे नवे मॉडेल आणण्यात मदत मिळत आहे.
- विंकेश गुलाटी, अध्यक्ष, फाडा