वाहतूक पोलिसांचा मान राखलाच गेला पाहिजे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2017 09:19 PM2017-08-25T21:19:10+5:302017-08-25T21:19:33+5:30

वाहतूक पोलीस हा मोठ्या शहरांमधील वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा कणा असून त्यांचा मान राखणे, त्यांना सहकार्य करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

give honour to traffic police | वाहतूक पोलिसांचा मान राखलाच गेला पाहिजे

वाहतूक पोलिसांचा मान राखलाच गेला पाहिजे

googlenewsNext

गेल्या काही दिवसांमध्ये वाहतूक पोलिसांवर हल्ले करण्याचे प्रकार वाढत असताना दिसत आहेत. काही भारतीय नागरिकांकडून अशा प्रकारचे निर्लज्ज, बेजबाबदार व हिंसक वर्तन होणे ही अतिशय चिंताजनक बाब म्हणावी लागते. कायद्यानुसार अशा वर्तनामध्ये पकडण्यात आलेल्यांना योग्य ती सजा होत असतेही, पण मुळात अशा प्रकारचे वर्तन हे असंस्कृत आहे व ते रोखले गेले पाहिजे. याला कारण आहे ती कायदा न जुमानण्याची व नियम धाब्यावर बसवण्याची मानसिकता. राजकीय वा समाजधुरिणांकडूनही काहीवेळा विविध स्तरावर वा अन्य क्षेत्रातही असे वर्तन होत असते, त्यामुळे सर्वसाधारण नागरिकही अशा प्रकारच्या मानसिकतेला आपल्यामध्ये सामावून घेऊ पाहाता. वाहतूक पोलीस ही यंत्रणा आज काही म्हटले तरीही एका चाकोरीमध्ये, ठरवून दिलेल्या दिशेमध्ये काम करणारी आहे. शहरामधील वाहतूक कोंडीमध्ये सतत उभे राहून, वाहतूक नियमन करणे हे शारीरीक दृष्टीनेही अनेक त्रास देणारे आहे. पण वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल वा अधिकाऱ्यांच्या कर्तव्यामध्ये या गोष्टी स्वीकार्य होतात, त्यांचे नियमितपणे तेथे असणारे काम व त्यातही आपल्या वैयक्तिक त्रासालाही स्वीकारून नेमाने वाहतूक नियमन करमे हे सोपे नाही.समाजावर होत असणारे हे एक प्रकारचे उपकारच आहेत, हे प्रत्येक नागरिकाने लक्षात घेण्याची गरज आहे. स्वतः वाहतूक नियम तोडायचे व वर अरेरावी दाखवीत एकंदर पोलीस खात्यामधील भ्रष्टाचाराला प्रत्येकवेळी सर्व पोलीस कर्मचाऱ्यामध्ये पाहायचे हा देखील नागरिकांकडून केला जाणारा प्रकार अतिशय निंदनीय आहे.
काही काळापूर्वी एका अल्पवयीन मुलाने मुंबईत वांद्रे येथे वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्यावर अतिशय अमानवी हल्ला केला , त्यात शिंदे यांचा झालेला मृत्यू ही बाब सर्वांच्यादृष्टीने अतिशय शरमेची आहे. मुळात वाहतूक पोलीस ज्या परिस्थितीत काम करतात, ज्या शारीररीक समस्यांना, मानसिक दबावांमध्ये काम करतात, ज्या तणावामध्ये काम करतात ते पाहिले तर नक्कीच त्यांचे कौतुक करण्यासारखेच नव्हे तर त्यांचा मान राखून त्यांच्याशी प्रत्येक नागरिकाने वर्तन केले पाहिजे. वाहतूक नियमन करीत उन्हा पावसात काम करणाऱ्या वाहतूक पोलिसांना सर्व प्रथम एक माणूस म्हणूनही पाहाण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यात सरकार, लोकप्रतिनिधी यांनीही तसे वर्तन करायला हवे.मुंबई, पुणे, ठाणे, महाराष्ट्रातील अनेक शहरे व महामार्ग या ठिकाणी या वाहतूक पोलिसांची कामे ही त्यांना मिळणाऱ्या वेतन, सुविधा व कामाचे तास या तुलनेत खूप मोठी आहेत.प्रत्येक वाहनचालकाने वाहतुकीचे नियम पाळणे, त्यामुळे वाहतूक कोंडी सोडवायला पोलिसांना स्वतःहून मदत करणे, ते जमत नसले तर किमान त्या पोलिसांना त्यांच्या कामात सहकार्य करणे हे वाहनांच्या चालक व मालक या दोघांच्यादृष्टीने गरजेचे आहे. हे वाहतूक पोलीस आपल्यासाठी, आपल्या सुरक्षिततेसाठी, सुलभ वाहतुकीसाठी काम करीत असतात, हे लक्षात ठेवून वाहतूक पोलिसांचा योग्य तो सन्मान राखणे हे अतिशय महत्त्वाचे व उत्तम नागरिकत्त्वाचे लक्षण आहे.

Web Title: give honour to traffic police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस