दुचाकीवरील हॅण्डग्रीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 04:44 PM2017-08-02T16:44:26+5:302017-08-02T16:44:50+5:30
स्कूटर वा मोटारसायकलच्या स्टिअिरंग रॉडवर हाताची पकड व्यवस्थित असणे गरजेचे आहे. यासाठी त्यावर कव्हर लावले जाते पण ते घेताना तुम्ही योग्य त्या प्रकारची कव्हर्स घेतली तर हाताला त्रास होणार नाही की दुखापतही होणार नाही.
दुचाकीवर नियंत्रणासाठी सर्वात महत्त्वाचा भाग असतो म्हणजे स्टेअिरंग रॉडवर असणारी तुमची मजबूत पकड. ही पकड मजबूक राहाण्यासाठी तुमच्या हॅण्डग्रीपवर खास कव्हर्स बसवण्यात येतात. सर्वसाधारणपणे मोटारसायकल वा स्कूटर विकत घेताना कंपनीकडून साधारण साजेशी कव्हर्स मिळतात. तुमच्या हातांना येणारा घाम तुमच्या स्टेअरिंग रॉडवरील पकड सैल करू नये या दृष्टीने ही कव्हर्स उपयुक्त असतात. बाजारात त्या कव्हर्सचे विविध प्रकार मिळतात. फॅन्सी कव्हर्स पासून अगदी साध्या प्रकारच्या या कव्हर्सची निवड करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, पण ही घेताना पूर्ण विचार करूनच ती घ्या. अनेकदा दिसायला छान वाटतात, हाताला मऊ वाटतात म्हणून ती आपल्या दुचाकीला बसवण्यासाठी अनेकांना आवडते. पण मुळात त्यांचा वापर कशासाठी असतो, हे लक्षात घेण्याची गरज आहे.
स्कूटर वा मोटारसायकल चालवण्याची पद्धत वेगळी असते. त्यासाठी नियंत्रण मात्र तुम्हाला हॅण्डलवर ठेवावे लागते व मोटारसायकल व स्कूटरच्या वजनाप्रमाणे तुम्हाला तुमच्या हॅण्डलवर पकड ठेवावी लागते. प्रत्येकाची चालवण्याची व हॅण्डलबारवर जोर देण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. मात्र अनेकदा ग्रीपवर घट्ट पकड देऊन दुचाकी चालवणारे अनेक लोक आहेत. त्यांच्या हाताला ब्रेक लावताना, अकस्मातपणे थांबवायची असेल तेव्हा किंवा एक्सरेशन देतानाही हाताची पकड विनाकारण मजबूत वा घट्ट केली जात असते. गीयर टाकताना, क्लच दाबतानाही ही पकड जास्त जोर लावून घट्ट करणारेही अनेक लोक आहेत. यामुळे तुमच्या हातावर दाब येण्याची व त्यामुळे हाताची एखादी शीर दाबली जाऊन दुखापत होण्याचाही धोका असतो. यासाठी हॅण्डलग्रीपवरचे कव्हर हे अनेकदा तुमच्या हाताला दुखापत होण्यापासून वाचवते. काही कव्हर्स ही कडक असतात तर काही ब्रशसारखी वा वेलवेटसारखी असतात. अशा प्रकारची कव्हर्स घेताना मुळात शांतपणे विचार करून ती घ्या. नाहीतर मग त्रास होतो म्हणून ती बदलण्याची वेळ येते. हॅण्डलग्रीप नीट पकडण्यासाठी कंपनीकडून जी काही कव्हर्स दिली जातात, ती बऱ्यपैकी असतात. तरीही तुम्हाला त्रास वाटत असेल तर एक तर चामड्याचे हातमोजे जे खास स्कूटर वा बाईक चालवण्यासाठी तयार केलेले असतात, ते घ्यावेत. त्यामध्ये तुमच्या हाताला घाम जरी आला तरी हॅण्डलवरची पकड ढिली पडत नाही. तसेच तुम्हाला हाताला सुयोग्य वाटतील अशी कव्हर्स घ्यावीत. साधारण पॉलिथिन, रबर यापासून ही तयार केलेली कव्हर्स असून त्यावरचे डिझाईन मात्र काळजीपूर्वक निवडा. झिरमिळ्या असलेल्या वा अतिफॅन्सी अशा प्रकारच्या कव्हर्समुळे दुचाकी चालवताना अडथळा येऊ शकतो. तसेच कालांतराने ती खराबही होत असतात. अतिमऊ कव्हर्सने हॅण्डलवर ग्रीप घेणे कठीण जाते. यामुळेच कव्हरचा वापर करताना त्रास होणार नाही, घामामुळे, पावसाळ्यात पाण्यामुळे तुमची पकड ढिली पडणार नाही, अशी हॅण्डलग्रीप कव्हर असणे केव्हाही चांगले.