बुलेटलाही विसराल! मन जिंकण्यासाठी येतेय मेड-इन-इंडिया Harley बाइक; पाहा जबरदस्त लूक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 04:06 PM2023-04-05T16:06:55+5:302023-04-05T16:11:45+5:30
हार्ले-डेविडसन आणि हिरो मोटोकॉर्प कंपनी एकत्र मिळून भारतीय बाजारासाठी एक नवी बाइक तयार करत आहे.
हार्ले-डेविडसन आणि हिरो मोटोकॉर्प कंपनी एकत्र मिळून भारतीय बाजारासाठी एक नवी बाइक तयार करत आहे. सिंगल सिलिंडरवाली ही बाइक बाजारात प्रामुख्यानं रॉयल एनफील्डच्या बाइकला टक्कर देणार आहे. आता या बाइकचे काही फोटो इंटरनेटवर लीक झाले आहेत आणि समोर आलेल्या फोटोंनुसार बाइकचा लूक दमदार आहे. हार्ले डेविडसनची ही आजवरची सर्वात स्वस्त बाइक ठरणार असल्याचा दावा केला जात आहे. जी मुख्यत्वे भारतीय बाजारपेठेसाठी तयार केली जात आहे. या बाइकची चाचणी जयपूर स्थित हिरो मोटोकॉर्पच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये केली जात आहे. म्हणजे लवकरच ही बाइक भारतीय रस्त्यांवर धावताना दिसेल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार या बाइकचं डिझाइन आणि स्टायलिंगचं काम हार्ले-डेविडसननं केलं आहे. तर याचं इंजिनिअरिंग, टेस्टिंग आणि तिची निर्मिती पूर्णपणे हिरो मोटोकॉर्प कंपनीकडून केली जात आहे. समोर आलेल्या फोटोंनुसार या बाइकमध्ये डे-टाइम-रनिंग लाइट्सचा वापर केला गेला आहे. ज्यावर Harley-Davidson असं लिहिण्यात आलं आहे. असंच काहीसं नुकतंच लॉन्च झालेल्या टीव्हीएसच्या Ronin बाइकमध्येही पाहायला मिळालं होतं.
इंजिन क्षमता
Harley-Davidson च्या या नव्या बाइकमध्ये कंपनीनं एअर/ऑइल कूल्ड 400cc क्षमतेचं सिंगल सिलिंडर इंजिनचा वापर करण्यात येऊ शकतो. बाइकच्या मागच्या नंबर प्लेटवर पाहता येऊ शकेल की त्यावर HD 4XX असं लिहिलेलं आहे. हे बाइकच्या इंजिन क्षमतेचे संकेत मानले जात आहेत. बाइकमध्ये ६-स्पीड गियरबॉक्स पाहायला मिळू शकतो. पण अद्याप या बाइकच्या इंजिनच्या पावर आऊटपूटबाबत कोणतीही माहिती कळू शकलेली नाही.
किंमत किती असेल?
सध्या या बाइकची चाचणी केली जात आहे आणि लॉन्च आधीच या बाइकच्या किमतीबाबत माहिती देणं कठीण आहे. या बाइकच्या निर्मितीत हिरो मोटोकॉर्प कंपनी सक्रियपणे पुढाकार घेत आहे. त्यामुळे या बाइकची किंमत कमी असू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जवळपास २.५ ते ३ लाख रुपये इतक्या किमतीत ही बाइक भारतीय बाजारात लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. बाजारात दाखल झाल्यानंतर प्रामुख्यानं ही बाइक रॉयल एनफील्डच्या क्लासिक ३५० ला टक्कर देईल.
केव्हा लॉन्च होणार?
मीडिया रिपोर्टनुसार ही बहुप्रतिक्षीत बाइक जुलै ते ऑगस्टच्या दरम्यान सादर केली जाऊ शकते. तर दिवाळीच्या मुहूर्तावर भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. येत्या काळात हार्ले-डेविडसन आणि हिरो मोटोकॉर्प ही बाइक वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय बाजारात देखील निर्यात करू शकते.