हेल्मेट दुचाकीबरोबरच ठेवण्यासाठी हेल्मेट लॉक व बॉक्स यांचा वापर नक्कीच करा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 08:54 AM2017-11-27T08:54:56+5:302017-11-27T08:56:01+5:30
हेल्मेट वापरणे ही काळाची गरज असली तरी ते सांभाळण्यासाठी असणारे हेल्मेट लॉक, हेल्मेट बॉक्स याचा फायदा प्रत्येकाने घ्यायला हवा. तर हेल्मेट बाळगण्याची सवय लागेल व वापरण्यासही सुलभ वाटेल.
स्कूटर असो वा मोटारसायकल, ती वापरावयाची तर सध्या कायद्यानुसार हेल्मेटचा वापर करणे सक्तीचे आहे. हेल्मेट वापर करणे हे केवळ सक्तीमुळे नव्हे तर सुरक्षिततेच्या कारणासाठीही गरजेचे आहे हे लक्षात घेतले पाहिजे. मात्र अनेकजण तसे करीत नाहीत. त्याची काहीही कारणे सांगणारे कमी नाहीत. मात्र त्यातील एक कारण पूर्वीपासून आवर्जून सांगितले जात होते. ते म्हणजे, अहो हेल्मेट वापरायची इच्छा असते, ते वापरणे गरजेचे व सुरक्षिततेचे आहे, पण ठेवणार कुठे, प्रत्येक ठिकाणी जायचे असेल तर ते काय हातात घेऊन फिरणार का, म्हणजे ते ओझेच की,,,, असे प्रश्न करीत हेल्मेट वापरणे टाळले जात असे.
खरे म्हणजे अगदी वीस-पंचवीस वर्षांपासून हेल्मेट ठेवण्याची सुविधा होती. त्यासाठी चालकाला दुचाकी पार्क केल्यानंतर हेल्मेट स्वतःबरोबर घेऊन जाण्याचीही गरज नव्हती. त्यासाठी हेल्मेट लॉक व हेल्मेट बॉक्स असे दोन्ही प्रकार होते. स्कूटरला हेल्मेट बॉक्स अॅटेच करता येत असे. तसेच हेल्मेटला लॉकची सुविधाही उपलब्ध होती. अगदी त्यावेळीही हेल्मेट एका साखळीला अडकवून कुलूप लावून जाणारेही अवलिया होते. पण बाजारामध्ये हेल्मेट लॉक विकत मिळते. हाफ हेल्मेटला ती अडकवण्याची सुविधा असणारे लॉक नसले तरी त्या हेल्मेटच्या पट्ट्यामध्ये एक बक्कल असते त्यात हेल्मेट लॉक करण्यासाठी सुविधा असते.
एका जाडजूड लोखंडी साखळीमध्ये वा वायरमध्ये ज्याला वरून प्लॅस्टिकचे आवरण असते व लॉकही असते. त्या आधारे स्कूटरला ते अडकवता येते. स्कूटरला मागे बसण-याला हात बकडण्यासाठी जे हँडल असते, त्याला हे हेल्मेट अडकवून लॉक करता येते. पूर्ण हेल्मेटला पूर्णपणे लॉक करण्यासाठी असणारे लॉक मोटारसायकलीला नटबोल्टद्वारे अडकवता येते व त्याला हेल्मेट लॉक करता येते. खरे म्हणजे हेल्मेट चोरीला जाण्याची शक्यता असल्याने हे लॉक्स आणले गेले व ते उपयुक्तही आहेत, यात शंका नाही.
पावसाळ्यामध्ये हेल्मेट लॉकला लावले तर ते भिजेल असे म्हणणे ही देखील हेल्मेट न वापरण्याचा बहाणा करण्याचा प्रकार आहे. प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये वा एखाद्या प्लॅस्टिकच्या कागदामध्ये ते नीट बांधून मग ते लॉक करता येते. सध्याच्या स्कूटर्समध्ये हेल्मेट ठेवण्यासाठी आसनाखाली खास प्रश्स्त जागा असते. त्यात हेल्मेट सहज राहाते, तसेच काही प्रमाणात सामानही हेल्मेट ठेवल्यावर राहू शकते. मुळात हेल्मेट न वापरण्यासाठी बहाणे करण्याऐवजी सुरक्षिततेबरोबर कायद्याचे पालन करण्याची वृत्ती आपणच वाढवायला हवी. अन्यथा कारणे काय प्रत्येकाला शोधता येतात…!