ग्राहकांना झटका! Hero च्या स्कूटर्स-बाईक्स 'या' तारखेपासून महागणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 12:17 PM2023-10-01T12:17:59+5:302023-10-01T12:34:39+5:30
Hero MotoCorp ने बाईक्स आणि स्कूटर्सच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : हिरो स्कूटर्स (Hero Scooters) आणि हिरो बाईक्स (Hero Bikes) ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. मात्र, आता सणासुदीच्या आधी हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) कंपनीने ग्राहकांना मोठा धक्का देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. Hero MotoCorp ने बाईक्स आणि स्कूटर्सच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही हिरो कंपनीची नवीन बाईक किंवा स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, तर आता तुमच्याकडे जुन्या किमतीत खरेदी करण्यासाठी फक्त अजून दोन दिवस उरले आहेत.
दरम्यान, Hero MotoCorp चे सर्व मॉडेल्स नाही तर फक्त निवडक मॉडेल्स 3 ऑक्टोबर 2023 पासून महाग होणार आहेत. 3 ऑक्टोबर 2023 पासून Hero MotoCorp च्या निवडक व्हेरिएंट्सच्या किमती 1 टक्क्यांनी वाढणार आहेत. मात्र, कंपनीने अद्याप किंमतींमध्ये किती वाढ होणार आहे, याची अचूक माहिती दिलेली नाही. तसेच, कोणत्या मॉडेल्सच्या किंमतींमध्ये वाढ होणार आहे, याबद्दल कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही.
Hero Karizma XMR 210 ची नवीन किंमत
काही दिवसांपूर्वी Hero MotoCorp ने Hero Karizma XMR 210 ही बाईक ग्राहकांसाठी 1,72,900 रुपये (एक्स-शोरूम) मध्ये लाँच केली होती, परंतु आता या बाईकची किंमत 7 हजार रुपयांनी वाढली आहे. आता ही बाईक घेण्यासाठी तुम्हाला 1 लाख 80 हजार रुपये (एक्स-शोरूम) खर्च करावे लागतील.
वाढत्या किमतींबद्दल कंपनीचे काय म्हणणे आहे?
किमती वाढवण्याबाबत Hero MotoCorp ने सांगितले की, किमती वाढण्यामागे मार्जिन, महागाई दर आणि मार्केट शेअर इत्यादी अनेक कारणे आहेत. दरम्यान, यापूर्वी जुलैमध्ये हिरोने निवडक मॉडेल्सच्या किमती 1.5 टक्क्यांनी वाढवल्या होत्या. दरवर्षी सणासुदीच्या काळात स्कूटर आणि बाइक्सची मागणी लक्षणीय वाढते. त्यामुळे आता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की, किमती वाढल्याने विक्रीत घट होणार की वाढ.