ई-सायकलवरून करा डोंगरांवर स्वारी; यामाहा-हिरोची बात न्यारी, पण किंमत 'भारी'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 08:07 PM2019-09-17T20:07:51+5:302019-09-17T21:27:11+5:30
भारतात सध्या वाहन उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मंदी असल्यामुळे अनेक प्रसिद्ध कंपन्यांना आपले उत्पादन बंद करावे लागत आहे.
भारतात सध्या वाहन उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मंदी असल्यामुळे अनेक प्रसिद्ध कंपन्यांना आपले उत्पादन बंद करावे लागत आहे. तसेच देशातल्या मोठमोठ्या कंपन्या बंद होत असताना यामाहा व हिरो या कंपनीने ई- सायकल बाजारपेठेत दाखल केली आहे.
डोंगरावर सायकल चालवणाऱ्या उत्साही लोकांसाठी यामाहा मोटार कंपनी, हीरो सायकल आणि मित्सुई कंपनी यांनी एकत्रित येऊन लेक्ट्रो ईएचएक्स 20 ई- सायकल भारतात लॅाच केली आहे. लेक्ट्रो ईएचएक्स 20 ई- सायकलमध्ये यामाहा कंपनीची इलेक्ट्रिक मोटार वापरण्यात आली असून हीरो कंपनीकडून या सायकलची निर्मिती करण्यात आली आहे.
एचएमसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंजक एम मुंजाळ यांनी सांगितले की, हिरो सायकल आणि यामाहा मोटार कंपनीने एकत्रित येऊन लेक्ट्रो ईएचएक्स २० चे अनावरण केल्याचा अभिमान आहे. तसेच अनेक ई- सायकलमध्ये मागील हब मोटारचा वापर करण्यात येतो. मात्र लेक्टरो ईएचएक्स २० ही एकमेव इलेक्ट्रिक सायकल आहे जी सेंटर मोटरद्वारे चालविली जाणार आहे. त्याचप्रमाणे या ई- सायकलीची किंमत 1 लाख 35 हजार असणार असल्याची माहिती देखील पंजक यांनी दिली आहे.
लेक्ट्रो ईएचएक्स २० ही एक पॅडल असिस्ट सायकल असून या सायकलला पॅडलिंगद्वारे किंवा इलेक्ट्रिक द्वारे चालवता येणार आहे. या ई- सायकलमध्ये ट्रिपल सेन्सर तंत्रज्ञान, टॉर्क सेन्सर, क्रॅन्क सेन्सर आणि स्पीड सेन्सरचा समावेश आहे. यामुळे सायकल जलद पॅडलिंग आणि सुधारित उर्जा प्रदान करु शकणार आहे. त्याचप्रमाणे ही ई- सायकल 3.5 तास चार्ज केल्यानंतर 60 ते 70 किलोमीटर पर्यत धावू शकणार आहे. तसेच ऑफ-रोड क्षमता हायड्रॉलिक सस्पेंशन सेटअपद्वारे पूरक असून ब्रेकिंग हार्डवेअरमध्ये दोन्ही बाजूंनी शिमॅनो हायड्रॉलिक डिस्क ब्रेक देण्यात आले आहे.