Hero Electric ने आणली Hero Eddy इलेक्ट्रिक स्कूटर; पाहा फीचर्स आणि लॉन्चिंग डेट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 03:34 PM2022-03-01T15:34:29+5:302022-03-01T15:36:00+5:30
Hero Eddy Electric Scooter : जे लोक दररोज कमी अंतराचा प्रवास करतात, जसे की कॉफी शॉपमध्ये जाणे, भाजी घेण्यासाठी जाणे, खरेदीसाठी जाणे, अशा ग्राहकांसाठी ही आगामी इलेक्ट्रिक स्कूटर डिझाइन केली आहे.
नवी दिल्ली : हिरो इलेक्ट्रिकने हिरो एडी (Hero Eddy) इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत आज म्हणजेच 1 मार्च रोजी सादर केली आहे. कंपनी पुढील तिमाहीत लॉन्च करण्याचा विचार करत आहे. जे लोक दररोज कमी अंतराचा प्रवास करतात, जसे की कॉफी शॉपमध्ये जाणे, भाजी घेण्यासाठी जाणे, खरेदीसाठी जाणे, अशा ग्राहकांसाठी ही आगामी इलेक्ट्रिक स्कूटर डिझाइन केली आहे. ग्राहकांना टेक्नॉलॉजीसह सर्वोत्कृष्ट फीचर्स देण्याचा कंपनीचा उद्देश आहे.
फीचर्स
Hero Eddy मध्ये अनेक चांगले फिचर्स देण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, फाइंड माय बाईक, एक मोठी बूट स्पेस, हेडलॅम्प आणि रिव्हर्स मोड इत्यादी देण्यात आले आहे. हिरो इलेक्ट्रिक पुढील तिमाहीत हे उत्पादन लॉन्च करण्याचा विचार करत आहे. कंपनी लॉन्च दरम्यान या ई-स्कूटरचे अतिरिक्त फीचर्स आणि किंमत याबाबत सांगण्याची शक्यता आहे.
कलर ऑप्शन
Hero Eddy electric scooter दोन कलर ऑप्शनसह ऑफर केली आहे, ज्यामध्ये पिवळा आणि हलक्या निळ्या कलरचा समावेश आहे. या ई-स्कूटरची खास गोष्ट म्हणजे, चालवायला लायसन्सची गरज भासणार नाही आणि रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही.
काय म्हणाले कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक?
हिरो इलेक्ट्रिकचे व्यवस्थापकीय संचालक नवीन मुंजाल म्हणाले की, आम्ही आमचे आगामी उत्पादन Hero Eddy ची घोषणा करताना आनंदी आहोत, ज्यात स्मार्ट फिचर्स आणि स्टायलिश लुक यांचा मेळ आहे. स्कूटरची रचना त्रासमुक्त राइडिंग अनुभव, कार्बन मुक्त भविष्यासाठी योगदान देण्याच्या वैयक्तिक प्रयत्नांना लक्षात घेऊन केली आहे. तसेच, कंपनीला विश्वास आहे की Hero Eddy आराम आणि सुविधा देताना एक आदर्श पर्यायी गतिशीलता पर्याय बनवेल, असे नवीन मुंजाल यांनी सांगितले.
लुधियानामधील प्लांटमध्ये स्कूटरचे उत्पादन
हिरो इलेक्ट्रिक आपल्या लुधियाना येथील प्लांटमध्ये त्याच्या आगामी इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन करत आहे. लॉन्च झाल्यानंतर, येथून ही इलेक्ट्रिक स्कूटर देशभरात आणली जाईल.