Hero ची कमाल; एकाच महिन्यात केली ७ हजारांपेक्षा अधिक Electric Scooters ची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 01:08 PM2021-12-09T13:08:20+5:302021-12-09T13:08:20+5:30
हीरो इलेक्ट्रीकनं (Hero Electric) गेल्या महिन्यात मोठी कमाल केली आहे. नोव्हेंबर महिन्यात ७ हजारांपेक्षा अधिक गाड्यांची विक्री केली आहे.
Hero Electric Scooters : हीरो इलेक्ट्रीकनं (Hero Electric) गेल्या महिन्यात मोठी कमाल केली आहे. देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रीक दुचाकी कंपनी हीरो इलेक्ट्रीकनं नोव्हेंबर महिन्यात ७ हजारांपेक्षा अधिक गाड्यांची विक्री केली आहे. JMK रिसर्च आणि VAHAAN डॅशबोर्डच्या एका रिपोर्टमध्ये यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. हीरो इलेक्ट्रीकनं गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ११६९ गाड्यांची विक्री केली होती.
या सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे आणि कंपनी ही मागणी पूर्णदेखील करणार आहे. सरकारकडूनही सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत आणि इलेक्ट्रिक मोबिलिटीची मागणीही वाढत आहे. सणासुदीच्या काळामुळे इलेक्ट्रीक वाहनांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कंपनी सिटी-स्पीड कॅटेगरीमध्ये उत्तम कामगिरी करत असल्याचं हीरो इलेक्ट्रीकनं म्हटलं आहे.
सरकारच्या प्रयत्नांना यश
“आम्ही भारतात इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरात तेजी पाहत आहोत. आम्हाला इलेक्ट्रीक मोबिलिटी सोल्युशन्सकडे एक मजबूत कन्झुमर कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय, सरकारच्या प्रयत्नांमुळे आणि ग्राहकांसाठीच्या धोरणांमुळे कंपनीच्या वाहनांची मागणी वाढली आहे. इलेक्ट्रीक वाहनाच्या वाढत्या विक्रीदरम्यान आम्ही मागणीही पूर्ण करण्याचे प्रयत्न करत आहोत. चांगल्या कामगिरीसह आम्ही हे वर्ष पूर्ण करू,” असा विश्वास कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोहिंदर गिल यांनी व्यक्त केला.