Splendor बाईक्ससह Hero नं केलं असं काही, की थेट गिनिज बुकमध्ये नावाची झाली नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 04:27 PM2021-08-11T16:27:58+5:302021-08-11T16:28:53+5:30
Hero Motocorp : हिरो कंपनी Honda पासून वेगळी झाल्याच्या १० वर्षांच्या निमित्तानं प्रदर्शित करण्यात आला लोगो.
जगातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक हिरो मोटोकॉर्पने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. सर्वात मोठं नाव (सर्वात मोठा मोटारसायकल लोगो) बनवण्यासाठी कंपनीचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं आहे. हिरो मोटोकॉर्पने २९ जुलै रोजी हा विक्रम केला होता, परंतु कंपनीच्या वैयक्तिक म्हणजेच होंडापासून वेगळं झाल्यानंतर १० वर्षांच्या निमित्ताने तो ९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित करण्यात आला.
हिरो मोटोकॉर्पने आंध्र प्रदेशातील त्यांच्या प्रकल्पामध्ये कंपनीच्या लोगोच्या डिझाईनमध्ये 1,845 मोटारसायकल्स उभ्या करून हा सर्वात मोठा लोगो बनवला आहे. हा लोगो एका रिकाम्या मैदानावर (1000ft x 800ft) तयार करण्यात आला होता आणि त्यात फक्त स्प्लेंडर+ मोटारसायकलचा समावेश होता.
हे मोकळं मैदान कंपनीच्या उत्पादन केंद्राजवळ आहे, पण हे डिझाईन बनवण्यापूर्वी संपूर्ण मैदान समतल करण्यात आलं. सांगितलं जात आहे की हा संपूर्ण लोगो १०० लोकांच्या टीमनं ९० दिवसात पूर्ण केला आहे. यासाठी त्यांना सुमारे ३०० तास लागले.
“या वर्षाच्या सुरुवातीला, हिरो मोटोकॉर्पनं आपल्या स्थापनेनंतर १०० दशलक्ष दुचाकी विक्रीची नोंद केली आहे. विक्रीच्या दृष्टीने हा मैलाचा दगड आहे. आम्ही २०२१ मध्ये हा टप्पा गाठला आहे. या वर्षी आमच्या वैयक्तिक कामकाजाची १० वर्षेही पूर्ण झाली आहेत. आमच्यासाठी हा एक खास दिवस आहे," अशी प्रतिक्रिया हिरो मोटोकॉर्पचे ग्लोबल प्रोडक्ट प्लॅनिंग अँड स्ट्रँडजी प्रमुख मालो ले मॅसन यांनी दिली.