Hero MotoCorp Vida Electric Scooter Brand: ओरिजिनल हिरो मोटोकॉर्पने 'विडा' उचलला; १ जुलैला नव्या ब्रँडची इलेक्ट्रीक स्कूटर येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 12:53 PM2022-03-04T12:53:48+5:302022-03-04T12:56:16+5:30
Hero MotoCorp Electric Scooter Brand Vida: ओरिजिनल कंपनीचे हिरो हे नाव वेगळ्या झालेल्या हिरो इलेक्ट्रीक कंपनीला मिळाले आहे. तेव्हा हिरो मोटोकॉर्पच्या हे लक्षात आले नव्हते.
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी टू व्हीलर कंपनी हिरो मोटोकॉर्पने मोठी घोषणा केली आहे. इलेक्ट्रीक वाहनांच्या बाजारात कंपनी पाऊल ठेवणार असून यासाठी नव्या ब्रँडचे लाँचिंगही केले आहे. दुबईत झालेल्या एका कार्यक्रमात अध्यक्ष डॉ. पवन मुंजाल यांनी या इलेक्ट्रीक ब्रँडची घोषणा केली आहे.
मूळ कंपनी हिरो मोटोकॉर्पने इलेक्ट्रीक वाहने बाजारात आणू नयेत यासाठी काही वर्षांपूर्वी वेगळे झालेल्या हिरो इलेक्ट्रीकने न्यायालयात धाव घेतली होती. यावरून दोन भावंडांमध्ये वाद सुरु आहेत. ओरिजिनल कंपनीचे हिरो हे नाव त्या वेगळ्या झालेल्या कंपनीला मिळाले आहे. तेव्हा हिरो मोटोकॉर्पच्या हे लक्षात आले नव्हते. याचा फायदा त्या कंपनीला झाला असून हिरो मोटकॉर्प आपल्या नावाने इलेक्ट्रीक स्कूटर आणू शकत नव्हती. आता कंपनीने नवीन ब्रँड बाजारात आणला आहे.
या ब्रँडचे नाव विडा (Vida) असे ठेवले आहे. यामध्ये कंपनी १०० दशलक्ष डॉलर गुंतविणार असून या प्रकल्पासाठी ग्लोबल पार्टनरशीपमध्येही गुंतवणूक केली जाणारा आहे. हिरो हा देशातीलच नाही तर जगातील सर्वात मोठा टुव्हीलर ब्रँड आहे.
हिरोच्या या विडा ब्रँडची पहिली इलेक्ट्रीक स्कूटर १ जुलैला लाँच केली जाणार आहे. याच दिवशी हिरो मोटोकॉर्पचे माजी अध्यक्ष डॉ. बृजमोहन लाल यांची जयंती आहे. कंपनीच्या चित्तूर प्रकल्पात या स्कूटरची निर्मिती केली जाणार आहे.
वाद काय....
हिरो-होंडा जशी वेगळी झाली तशी हिरो कंपनीचेही दोन कुटुंबात विभाजन झाले आहे. दशकभरापूर्वी मुंजाल फॅमिलीमध्ये हिरो कंपनीची इलेक्ट्रीक विंग आणि मोटोकॉर्प असे विभागले गेले. आज दशकभराने हिरो कंपन्यांचे हे दोन मालक पुन्हा आमनेसामने आले आहेत. तेव्हा झालेल्या करारानुसार विजय आणि नवीन मुंजाल (पिता-पूत्र) यांना हिरो इलेक्ट्रीकची मालकी मिळाली, तर पवन मुंजाल यांना हिरो मोटोकॉर्पची मालकी. करारातील दाव्यानुसार विजय मुंजाल यांना इलेक्ट्रीक वाहनांसाठी हिरो हे नाव वापरण्याची परवानगी आहे, यामुळे मुळ हिरो कंपनीने त्यांच्या इलेक्ट्रीक वाहनांसाठी हिरो हे नाव वापरू नये असा दावा हिरो इलेक्ट्रीकने ठोकला आहे. यामुळे हिरो इलेक्ट्रीक ही खरी हिरो मोटोकॉर्प नाही, तर ती वेगळी कंपनी आहे.