Hero Motocorp ची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर Vida V1 लाँच; 165KM ची मिळेल रेंज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 04:20 PM2022-10-07T16:20:44+5:302022-10-07T16:21:36+5:30
Vida V1 : कंपनीने आपल्या नवीन इलेक्ट्रिक वाहन कंपनी - Vida अंतर्गत पहिली स्कूटर Vida V1 लाँच केली आहे. ही स्कूटर Vida V1 Plus आणि V1 Pro या दोन व्हेरिएंटमध्ये आणली गेली आहे.
नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) अखेर आज इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये एन्ट्री केली आहे. कंपनीने आपल्या नवीन इलेक्ट्रिक वाहन कंपनी - Vida अंतर्गत पहिली स्कूटर Vida V1 लाँच केली आहे. ही स्कूटर Vida V1 Plus आणि V1 Pro या दोन व्हेरिएंटमध्ये आणली गेली आहे.
हिरो कंपनीचा दावा आहे की, इलेक्ट्रिक स्कूटरला अनेक उत्कृष्ट फीचर्ससह सादर करण्यात आले आहे. यात टच स्क्रीन डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल, कीलेस कंट्रोल आणि अॅलॉय व्हील यांसारखे फीचर्स आहेत. कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर दीड लाखांच्या रेंजमध्ये आणली आहे. कंपनीने Vida V1 Plus ची किंमत 1.45 लाख रुपये आणि V1 Pro ची किंमत 1.59 लाख रुपये आहे. या स्कूटरचे बुकिंग 10 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
ग्राहक स्कूटर 2499 रुपयांमध्ये बुक करू शकतात. स्कूटरची डिलिव्हरी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल. सुरुवातीला ही स्कूटर दिल्ली, बंगळुरू आणि जयपूर या तीन शहरांमध्ये उपलब्ध करून दिली जाईल. डिसेंबरमध्ये दुसऱ्या टप्प्यात आणखी शहरे जोडली जातील. बुकिंगसाठी ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करू शकतात.
Vida V1 Pro
हे Vida V1 चे अधिक पॉवरफुल व्हर्जन आहे. ही स्कूटर फुल चार्जमध्ये 165 किमी अंतर कापते. स्कूटरचा टॉप स्पीड 80KM प्रति तास आहे. ती 3.2 सेकंदात 0 ते 40kmph चा वेग गाठते.
Vida V1 Plus
हे Vida V1 चे कमी पॉवरफुल व्हर्जन आहे. ही स्कूटर फुल चार्जमध्ये 143 किमी अंतर कापते. स्कूटरचा टॉप स्पीड 80KM प्रति तास आहे. ती 3.4 सेकंदात 0 ते 40kmph चा वेग गाठते.
Hero Vida V1: 70 टक्क्यांपर्यंत किमतीवर बायबॅक
कंपनी ग्राहकांना Vida V1 साठी किमतीच्या 70 टक्क्यांपर्यंत बायबॅक योजना ऑफर करणार आहे. याशिवाय ग्राहकांचा भरोसा वाढवण्यासाठी कंपनी 72 तास किंवा 3 दिवसांसाठी टेस्ट राइड प्लॅन ऑफर करेल. Vida V1 इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी IP67 रेटिंग आहे. Vida V1 एक 'स्मार्टफोन ऑन व्हील्स' असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. म्हणजेच, तुमच्या स्मार्टफोनला कनेक्ट केल्यानंतर, ते डिस्प्लेवर सर्व आवश्यक माहिती दर्शवते.