१ डिसेंबरपासून HERO च्या टू-व्हिलर्स खिसा कापणार, वर्षभरात चौथ्यांदा होणार वाढ; पाहा किती महागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 11:29 PM2022-11-29T23:29:11+5:302022-11-29T23:31:52+5:30
Hero MotoCorp Price Hike: हीरो मोटोकॉर्प १ डिसेंबर २०२२ पासून आपल्या दुचाकींच्या किंमतीत वाढ करणार आहे. हीरोची दुचाकी घेणार असाल तर जुन्या किंमतीत घेण्यासाठी तुमच्याकडे अखेरचा दिवस आहे.
Hero MotoCorp Price Hike: हीरो मोटोकॉर्प आपल्या ग्राहकांना मोठा झटका देणार आहे. कंपनी 1 डिसेंबर 2022 पासून आपल्या दुचाकींच्या किमती वाढवणार आहे. कंपनी आपल्या मोटारसायकल आणि स्कूटरच्या श्रेणीत 1,500 रुपयांपर्यंत वाढ करणार आहे. वाढलेल्या किमती मॉडेलनुसार बदलणार आहेत. जर तुम्ही 30 नोव्हेंबरला हीरोची दुचाकी खरेदी केली तर तुम्हाला वाढीव किंमत द्यावी लागणार नाही.
यापूर्वी, भारतातील सर्वात मोठ्या दुचाकी कंपनीने या सणासुदीच्या हंगामात आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला होता. Hero MotoCorp ने नवरात्रीपूर्वी आपल्या मोटरसायकल महाग केल्या होत्या. त्यानंतर कंपनीने आपली मोटरसायकल लाइनअपमध्ये 1,000 रुपयांची वाढ केली होती. वाढलेल्या किमती 22 सप्टेंबरपासून लागू झाल्या होत्या.
जानेवारी, एप्रिलमध्येही वाढ
हीरोने या वर्षी एप्रिलमध्ये आणि जानेवारीच्या सुरुवातीला आपल्या मोटरसायकलच्या किमती वाढवल्या होत्या. दोन्ही वेळा कंपनीने आपल्या मोटारसायकलींच्या किमती 2000-2000 रुपयांनी वाढवल्या होत्या.
का होतेय वाढ?
“एकूण महागाईचा विचार करता आमच्या मोटरसायकल आणि स्कूटरच्या किमती वाढवणे अत्यावश्यक बनले आहे. ग्राहकांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी आम्ही नाविन्यपूर्ण आर्थिक उपाय देत राहू. आम्ही त्वरित बचत कार्यक्रम देखील सुरू केले आहेत, जे आम्हाला पुढील खर्चाच्या प्रभावाची भरपाई करण्यात आणि मार्जिन सुधारण्यात मदत करतील,” अशी प्रतिक्रिया Hero MotoCorp चे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) निरंजन गुप्ता यांनी दिली.