तरुणीचा हायव्होल्टेज ड्रामा पाहून वाहतूक पोलिसांनीच टेकले हात; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 03:43 PM2019-09-16T15:43:58+5:302019-09-16T15:48:14+5:30
नवा कायदा लागू झाल्यापासून कोणाला 6 लाखांची पावती तर कोणाला गाडी दुसऱ्याची आणि पावती पोस्टाने पाठविल्याचे प्रकार घडत आहेत.
नवी दिल्ली : नव्या मोटार वाहन कायद्यामुळे नियम मोडणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. काही हजारात जाणारी पावतीची रक्कम पाहून अनेकांनी पोलिसांसमोर अक्षरश: हात जोडले आहेत. तर एकाने त्याची दुचाकीच पेटवून दिली आहे. दंडाची रक्कम काही लाखात जाऊन पोहोचली आहे. मात्र, एका युवतीने रस्त्यातच हायव्होल्टेज ड्रामा करत पोलिसांनाच दंडाची पावती रद्द करायला भाग पाडले आहे.
नवा कायदा लागू झाल्यापासून कोणाला 6 लाखांची पावती तर कोणाला गाडी दुसऱ्याची आणि पावती पोस्टाने पाठविल्याचे प्रकार घडत आहेत. आता राजधानी दिल्लीत स्कूटर चालविणाऱ्या एका युवतीने रस्त्यावरच हंगामा केला आहे. हे प्रकरण शनिवारचे असल्याचे समजते.
दिल्ली वाहतूक पोलिसांनी सांगितले की आम्ही नियमानुसार मुलीच्या स्कूटरची दंडाची पावती फाडत होते. तिच्या स्कूटरची नंबरप्लेट तुटलेली होती. तिच्या हेल्मेटला बेल्टही नव्हता. तसेच ती स्कूटर चालविताना फोनवर बोलतही होती. हे पाहून तिला पोलिसांनी स्कूटर बाजुला घ्यायला सांगितले. यावरून या मुलीने जोरजोरात पोलिसांवर खेकसायला सुरुवात केली. याचवेळी ही मुलगी पळून जाण्याचाही प्रयत्न करत होती. यामुळे पोलिस कर्मचारी तिच्या स्कूटरसमोर उभे राहिले आणि रोखण्याचा प्रयत्न केला. या काळात ही मुलगी हुज्जत घालत होती.
पोलिस पावती फाडत असल्याचे पाहून या मुलीने वाहतूक पोलिसांवर हेल्मेट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. तसेच रागाने हेल्मेट रस्त्यावर फोकले. त्यानंतर रडत रडत आत्महत्या करण्याचीही थेट धमकी देऊन टाकली. यामुळे पोलिसांनी तिला पुन्हा वाहतुकीचे नियम न तोडण्याची तंबी देत पावती न फाडता सोडून दिले.
अल्टो चालकाचे आव्हान
अल्टो कार मालकाने उत्तर प्रदेश पोलिसांना, तुम्ही चुकीची पावती केली आहे. मी अल्टो चालवतो आणि तुम्ही 144 किमीने जाणाऱ्या बलेनोचा फोटो काढून माझ्या अल्टोच्या नंबरवर 2000 रुपयांचा दंड आकारला आहे.
यावरून उत्तर प्रदेश पोलिस ट्रोल होऊ लागले असून या अल्टो मालकाने पोलिसांना त्याची 9 वर्षे जुनी अल्टो कार 144 च्या वेगाने पळवून दाखविण्याचे आव्हान दिले आहे. तसेच पोलिसांनी जर करून दाखविले तर तो 2000 रुपयांचा दंडही भरण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. यावर एका युजरने या मालकाला तुझ्या गाडीचा नंबर दुसऱ्या कारवर कसा असा प्रश्न विचारला आहे. यावर त्याने तेच मी ही विचारतोय, तो उत्तर प्रदेश आहे, तिथे काहीही होऊ शकते, असे खोचक उत्तर दिले आहे.