हिटलरच्या आवडत्या बीटलचा तब्बल 8 दशकांचा प्रवास संपणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 05:41 PM2018-09-14T17:41:10+5:302018-09-14T18:26:27+5:30
फोक्सवॅगनची थोडीशी अँटीक लूकमधली कार बीटलला 80 वर्षे पूर्ण होत असून तिने या काळात बरेच चढउतार अनुभवले आहेत.
नवी दिल्ली : फोक्सवॅगनची थोडीशी अँटीक लूकमधली कार बीटलला 80 वर्षे पूर्ण होत असून तिने या काळात बरेच चढउतार अनुभवले आहेत. गेल्या 20 वर्षात ही कार कमालीची लोकप्रिय ठरली होती. या काळात तिने 5 लाखांचा विक्रीचा टप्पा ओलांडला होता. ही कार पहिल्यांदा 1930 मध्ये बनविण्यात आली होती. 2019 मध्ये या कारचे उत्पादन थांबविण्याचा निर्णय फोक्सवॅगनने घेतला आहे.
मूळ बीटल ही कार 1930 मध्ये बनविण्यात आली होती. ही कार जर्मनीचा हकुमशहा अॅडॉल्फ हिटलरमुळे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कमालीची प्रसिद्ध झाली होती. यानंतर 1960 मध्ये या छोट्याशा कारने लोकांच्या मनात घर केले होते. 1979 मधील एका समस्येनंतर फोक्सवॅगनने अमेरिकेत या कारची विक्री बंद केली होती. परंतू मेक्सिको आणि लॅटीन अमेरिकेमध्ये या कारची विक्री सुरु होती.
1990 मध्ये फोक्सवॅगनला अमेरिकेत बराच संघर्ष करावा लागला होता. यामुळे स्पर्धेत टिकण्यासाठी तत्कालीन संचालकांनी बीटलला नव्या रुपात अमेरिकेमध्ये उतरविले आणि नंतर फोक्सवॅगनने नवे रेकॉर्ड बनविले. Ferdinand Porsche यांच्या संकल्पनेतून ही कार बनली होती. 1998 मध्ये ही कार नव्या आकर्षक अॅटीक रुपात सादर करण्यात आली.
एका वर्षात या बीटलने एकट्या अमेरिकेत 80 हजारचा टप्पा पार केला. परंतू सध्या या कारची विक्री मंदावली आहे. 1998 नंतर जगभरात 5 लाख बीटलची विक्री झाली आहे. सध्या पर्यावरण वाचविण्यासाठी अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये वीजेवर चालणाऱ्या गाड्यांना प्राधान्य दिले जात आहे. यामुळे बीटल बंद करून त्याजागी नवी इलेक्ट्रीक कार आणण्याचा फोक्सवॅगनचा मानस आहे.