Honda Amaze: होंडा अंडर करंट राहिली! छोट्या शहरांत 5 लाख कार विकल्या, फोर्डलाही जमले नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 12:32 PM2022-09-08T12:32:23+5:302022-09-08T12:32:44+5:30
कंपनीच्या एकूण विक्रीपैकी ४० टक्के वाटा. फोर्ड सारख्या कंपनीला भारतात सर्व मॉडेल्सच्या 10 लाख कार विकताना नाकीनऊ आले होते.
जपानची भारतात एकेकाळी कमालीची यशस्वी ठरलेली कंपनी होंडाने भारतीय बाजारात कमाल करून दाखविली आहे. होंडा सिटीमुळे लोकप्रिय झालेल्या या कंपनीने होंडा अमेझच्या पाच लाख कार विक्रीचा टप्पा गाठला आहे. ही कार कंपनीने २०१३ मध्ये लाँच केली होती. पहिल्या मॉडेलची विक्री जवळपास अडीज लाखांच्या आसपास झाल्यावर कंपनीने दुसरे फेसलिफ्ट आणले होते.
होंडा अमेझने ९ वर्षांत पाच लाख कार विकल्या आहेत. फोर्ड सारख्या कंपनीला भारतात सर्व मॉडेल्सच्या 10 लाख कार विकताना नाकीनऊ आले होते. होंडाने त्यांची एकच कार फोर्डच्या एकूण विक्रीच्या निम्मी विकली आहे.
Honda Amaze ही कार कंपनी राजस्थानमधील तापुकारा प्लान्टमध्ये उत्पादित करते. कंपनीच्या एकूण विक्रीपैकी ४० टक्के गाड्या या अमेझ आहेत. होंडा कार्स इंडिया लि. चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ताकुया सुमुरा म्हणाले की, “होंडा अमेझसाठी ५ लाख विक्रीचा टप्पा पार करणे हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. आम्ही अद्ययावत तंत्रज्ञान, वर्गातील उत्तम उत्पादने आणि अप्रतिम आरामदायीपणा, सुरक्षा व मनःशांती देण्याचा प्रयत्न करतो.
ही गाडी १.२ लिटर आयव्हीटेक इंजिनासह पेट्रोलमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन आणि सीव्हीटीमध्ये उपलब्ध आहे. तसेच ती डिझेल विथ १.५ लिटर- आयडीटीईसी इंजिनात उपलब्ध आहे. टिअर वन सिटीमध्ये ४० टक्के आणि टिअर २,३ सिटींमध्ये ६० टक्के विकली जाते. महत्वाची बाब म्हणजे सुमारे ४० टक्के ग्राहक हे पहिल्यांदाच कार घेणारे आहेत. ऑटोमॅटिक ट्रान्समिशनला ग्राहकांची पसंती वाढत असल्याचे कंपनीने सांगितले.