Honda कडून नवीन SUV चे नाव घोषित; वाचा कधी लाँच होणार? काय असतील फीचर्स?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 11:38 AM2023-05-04T11:38:58+5:302023-05-04T11:43:07+5:30
होंडाचे भारतीय युनिट होंडा कार्स इंडिया लिमिटेड (एचसीआयएल) लवकरच एक नवीन एसयूव्ही भारतीय बाजारात आणणार आहे.
जपानी कार निर्माता कंपनी होंडा (Honda) ही एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. या कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी आतापर्यंत नवनवीन एसयूव्ही, सेडान आणि हॅचबॅक कार्स बाजारात लॉन्च केल्या आहेत. दरम्यान, होंडाचे भारतीय युनिट होंडा कार्स इंडिया लिमिटेड (एचसीआयएल) लवकरच एक नवीन एसयूव्ही भारतीय बाजारात आणणार आहे. त्यामध्ये आपल्याला नवीन फीचर्स आणि अपडेटेड इंजिन आणि अन्य गोष्टी पाहायला मिळतील.
भारतातील प्रिमियम कार्सच्या आघाडीच्या उत्पादक कंपनीने एक घोषणा केली आहे. कंपनीच्या आगामी लॉन्च होणाऱ्या एसयूव्हीला होंडा एलिव्हेट (Honda Elevate) असे नाव देण्याची घोषणा होंडा कंपनीने केली आहे. होंडा एलिव्हेट ही कंपनीची नवीन माध्यम आकाराची एसयूव्ही आहे. या एसयूव्हीचा पुढील महिन्यामध्ये भारतात वर्ल्ड प्रीमिअर होणार आहे. हे मॉडेल जागतिक मॉडेल म्हणून विकसित करण्यात आले आहे.
ऑल न्यू एलिव्हेट हे मॉडेल एक आदर्श शहरी एसयूव्ही लॉन्च करण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांचे प्रतिनिधित्व करते. जे जीवनामध्ये चांगल्या गोष्टींसाठी आकर्षित करते. जगभरातील एसयूव्ही ची मागणी पूर्ण करण्यासाठी होंडा एलिव्हेट हे नवीन जागतिक मॉडेल म्हणून विकसित करण्यात आले आहे. नवीन मॉडेलमध्ये लोकांच्या जीवनशैलीच्या गरजा आणि होंडाच्या नवीन एसयूव्ही बद्दलच्या त्यांच्या अपेक्षांचा समावेश करण्यात आला आहे. भारत ही पहिली बाजारपेठ असणार आहे, जिथे होंडा एलिव्हेट लॉन्च होणार आहे.
कधी होणार लाँच?
ही एसयूव्ही पुढील महिन्यात लाँच होणार असल्याची माहितीही कंपनीकडून देण्यात आली आहे. तसेच,कंपनी 6 जून रोजी ही एसयूव्ही भारतीय बाजारपेठेत लॉन्च करू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, कंपनीकडून नेमकी तारीख अद्याप देण्यात आलेली नाही. कंपनीने ते जागतिक मॉडेल म्हणून तयार केले आहे. अशा स्थितीत भारतासोबतच इतर अनेक बाजारपेठांमध्ये हे लॉन्च केले जाऊ शकते.
काय असतील फीचर्स?
कारचे फीचर्स आणि इतर माहिती कंपनीने अद्याप शेअर केलेली नाही. मात्र, LED DRL, LED लाइट्स, सनरूफ, अॅम्बियंट लाइटिंग, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, 10.25-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, ऍपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो, पुश बटन स्टार्ट, कीलेस एंट्री, वायरलेस चार्जर, ABS, EBD, हिल स्टार्ट असिस्ट, TPMS, एअरबॅग्ज, 1.5L इंजिनसह अनेक फीचर्स दिले जातील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.