Honda Cars Price Hike : होंडा कार घेण्याचा विचार करताय? मग याच महिन्यात घ्या, अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 05:57 PM2023-08-22T17:57:03+5:302023-08-22T17:57:40+5:30
कार निर्माता कंपनी होंडा देशांतर्गत बाजारात आपले होंडा सिटी आणि होंडा अमेझ मॉडेल विकते.
नवी दिल्ली : होंडाचीकार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. पुढील महिन्यापासून होंडाकारच्या किंमती वाढणार आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, होंडा कार्स इंडियाने (Honda Cars India) आज आपल्या वाहनांच्या किमती वाढवल्याबद्दल माहिती दिली आहे. या किंमतीचे कारण वाढते इनपुट खर्च सांगण्यात आला आहे. याचबरोबर, त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी कंपनी पुढील महिन्यापासून आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहे.
कार निर्माता कंपनी होंडा देशांतर्गत बाजारात आपले होंडा सिटी आणि होंडा अमेझ मॉडेल विकते. इनपुट खर्च वाढत असतानाही कंपनी दबाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. होंडा कार्स इंडियाचे उपाध्यक्ष (विक्री आणि विपणन) कुणाल बहल म्हणाले की, वाढत्या इनपुट खर्चाचा परिणाम कमी करण्यासाठी आम्ही आमच्या होंडा सिटी आणि होंडा अमेझच्या किमती पुढील महिन्यापासून म्हणजे सप्टेंबरपासून बदलणार आहोत. सध्या, कंपनी वाहनांच्या किमती वाढविण्याचा विचार करत आहे.
होंडा अमेझ आणि सिटीची किंमत
कंपनी सध्या आपली कॉम्पॅक्ट सेडान होंडा अमेझ मॉडेल 7.05 लाख रुपये एक्स-शोरूमच्या किमतीत विकते. याचबरोबर, कंपनी आपली दुसरी मिड साइज सेडान कार होंडा सिटी जवळपास 11.57 लाख (एक्स-शोरूम) आणि होंडा सिटी ई : एचईव्ही (हायब्रीड कार) कार 18.89 लाख एक्स-शोरूमच्या सुरूवातीच्या किमतीत विक्री करते. दरम्यान, होंडा सिटी आणि होंडा अमेझ या देशांतर्गत बाजारात विकल्या जाणाऱ्या मारुती सुझुकी डिझायर आणि ह्युंदाई ऑरा सारख्या कारला टक्कर देतात.