ग्राहकांना आकर्षित करणा-या होंडा सिटीची भारतीय बाजारपेठेतील 20 वर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 02:57 PM2017-12-30T14:57:16+5:302017-12-30T14:58:47+5:30
होंडा सिटी २० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. १९९८ मध्ये भारतीय बाजारपेठेत सादर झालेल्या या सिटीचे चौथे जनरेशन नव्या ग्राहकांनाही आकर्षित करण्यात यशस्वी ठरले आहे.
जपानच्या होंडा कंपनीची भुरळ तशी भारतीय मनाला बऱ्याच काळापासून पडलेली आहे. मोटारसायकल, पंप अशा विविध उत्पादनांबरोबर वाहन उत्पादनात असणाऱ्या होंडा कार्स इंडियाने १९९८ मध्ये आणलेल्या होंडा सिटीने आजही भारतीयांच्या मनावर भुरळ घातलेली आहे. होंडा सिटी या सेदान प्रकारातील मोटारीने आरामदायी प्रवास, गती आणि चांगले मायलेजही देऊ करीत टिकावूपणाचाही प्रवास भारतीय बाजारपेठेमध्ये कायम ठेवला आहे. येत्या वर्षात आता होंडा सिटी ही कार २० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. अाजही भारतीय बाजारपेठेवर होंडा सिटीची पकड कायम आहे. एक विशिष्ट प्रकारची भुरळ ग्राहकांवर टाकण्यामागे नेमके होंडा सिटीचे वैशिष्ट्य तरी काय आहे, असा प्रश्न या निमित्ताने पडतो.
गेल्या वीस वर्षांमध्ये होंडा कंपनीला याच सिटी कारने एक ओळख भारतात मिळवून दिली. मारुती म्हटले की मारुती ८००, ह्युंदाई म्हटली की सँट्रो अशी ब्रॅण्डने ओळख लोकांना होत होती. असा तो काळ. यापैकी आज होंडाची सिटी ही सेदान कार भारतीय ग्राहकांच्या मनात विशिष्ट स्थान मिळवून आहे हे नाकारता येणार नाही.
होंडाने सिटीची आतापर्यंत चार व्हर्जन्स काढली असून नव्या पिढीमधील चौध्या व्र्जन्समधील सिटी सध्या बाजारात दिसते. ७ लाखांपेक्षा जास्त होंडा सिटी भारतात विकल्या गेल्या आहेत. गाडीची आकर्षक रचना, एक वेगळा आब या बरोबरच काळानुसार विविध सुविधा देणाऱ्या होंडाचे वैशिष्ट्य म्हणजे आसनांची अतिशय सुरेख रचना. चांगली लेगस्पेस, बसणाऱ्या व्यक्तीला मिळणारा आराम, पेट्रोल व डिझेलमध्येही असणारा इंधनाचा पर्याय, चालवण्यासाठी असणारी सुलभ हाताळणी, सेदान असूनही मागचे व पुढचे सर्व दृश्यमान होण्याची ड्रायव्हरला अनुकूल अशी रचना यामुळे ग्राहकांना सिटी अधिक आकर्षक व हवीहवीशी वाटली. पहिल्या पिढीतील १९९८ ते २००३ पर्यंतची होंडा त्यानंतर दुसऱ्या पिढीतील होंडा पूर्ण नव्या आरेखनासह होंडानी आणली व तीही १.७७ लाख इतक्या कारची विक्री झाली. सीव्हीटी व्हेरिअंटही त्यांनी आणली व सीव्हीटी ट्रान्समिशन असणारी ती भारतातील पहिली कार ठरली होती. २००० मध्ये व्हीटेक इंजिनानेही होंडा सिटीला एक नवजीवन बहाल केले.
सुरक्षिततेच्या बाबींचा विचार करता होंडा सिटीने त्या घटकांना सक्तीचे करण्यापूर्वी दहा वर्षे आधी सादर केले. एबीएस, एअरबॅग्ज आज होंडा सिटीच्या सर्व श्रेणींमधील कारमध्ये दिली जातात. २००८ ते २०११ मध्ये काहीशी आर्थिक मंदी असूनही होंडाच्या दुसऱ्या पिढीतील िसटीचा खप चांगलाच वाढला होता. १९९८ मध्ये १२ िवतरक ११ शहरांमध्ये होते आज त्यांचे जाळे विस्तारून २३४ शहरांमध्ये ३४९ वितरकांपर्यंत पोहोचले आहे. विक्री व सेवा यांचे जाळे ज्या प्रकाराने होंडाने वाढवले त्यात त्यांत्या सातत्याची जाणीव व्हावी. किंबहुना म्हणूनच होंडा सिटी चौथ्या पिढीतही नव्या ग्राहकांना आकर्षित करू शकते. स्पर्धात्मक काळातही त्यांनू यामुळेच बाजारातील आपले स्थान वैशिष्ट्यपूर्ण ठेवले आहे.