Honda Electric Scooter: होंडाच्या पहिल्या ईलेक्ट्रीक स्कूटरचे २३ जानेवारीला लाँचिंग; Activa EV असेल...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 09:55 AM2023-01-09T09:55:21+5:302023-01-09T09:55:45+5:30
Honda ने 23 जानेवारी 2023 साठी मीडियाला 'ब्लॉक युवर डेट' आमंत्रणे पाठवली आहेत.
जपानची दुचाकी कंपनी होंडा २०२५ पर्यंत जागतिक पातळीवर १० हून अधिक इलेक्ट्रीक स्कूटर लाँच करणार आहे. सध्या कंपनी दोन इलेक्ट्रीक स्कूटरवर काम करत असल्याचेही कंपनीने म्हटले होते. या स्कूटर आशियाई बाजारपेठा आणि युरोपमध्ये लाँच केल्या जाणार आहेत.
भारतात होंडाची ईलेक्ट्रीक स्कूटर येत्या २३ जानेवारीला लाँच होण्याची शक्यता आहे. Honda ने 23 जानेवारी 2023 साठी मीडियाला 'ब्लॉक युवर डेट' आमंत्रणे पाठवली आहेत. यात "नवीन स्मार्ट शोधण्यासाठी तयार व्हा" या टॅगलाइनसह फ्यूचर मीट्स प्रेझेंटचे चित्र देखील आहे. नवीन Honda इलेक्ट्रीक स्कूटर स्वॅपेबल बॅटरीसह येईल अशी अपेक्षा आहे.
होंडा कंपनी आपली सर्वाधिक खपाची अॅक्टिव्हाचे इलेक्ट्रीक व्हर्जन आणण्याची शक्यता आहे. होंडाची आगामी स्कूटर भारतीय बाजारपेठेत TVS iQube इलेक्ट्रिक, Ather 450X, Simple Energy One आणि Bounce Infinity E1 शी स्पर्धा करेल.
Honda ने बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (BMRCL) च्या सहकार्याने बॅटरी स्वॅपिंग सेवा सुरू केल्याची घोषणा केली आहे. होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि. ही भारतात बॅटरी स्वॅप सेवा सुरू करणारी ब्रँडची उपकंपनी आहे. ही बॅटरी पॅक सेवा सुरुवातीला इलेक्ट्रिक ऑटो रिक्षांसाठी वापरली जात आहे. या सेवेचा वापर होंडाच्या भविष्यातील इलेक्ट्रिक दुचाकींसाठी देखील केला जाण्याची शक्यता आहे.
होंडा आपल्या इलेक्ट्रिक दुचाकींसाठी स्थानिक पातळीवर पार्ट बनविण्याची योजना आखत आहे. यामुळे कंपनीला उत्पादन खर्च कमी करता येईल. असे झाल्यास ग्राहकांनाही कमी किंमतीत होंडाच्या ईलेक्ट्रीक स्कूटर मिळतील.