होंडा-निस्सान विलिनीकरण होण्यापूर्वीच धक्का? मित्सुबिशीचा डीलमधून बाहेर पडण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 16:44 IST2025-01-27T16:44:24+5:302025-01-27T16:44:45+5:30
एकमेकांसोबत स्पर्धा करण्यापेक्षा विलिनीकरण करण्याचा विचार या कंपन्यांत सुरु आहे. यामुळे खर्च कमी होणार असून नफ्यात वाढ होणार आहे. होंडा, निस्सान आणि मित्सुबिशी या तीन कंपन्यांचे विलिनीकरण केले जाणार होते.

होंडा-निस्सान विलिनीकरण होण्यापूर्वीच धक्का? मित्सुबिशीचा डीलमधून बाहेर पडण्याचा निर्णय
चिनी कंपन्यांच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जपानच्या तीन कंपन्या एकत्र येणार होत्या. परंतू, एकत्र येण्यापूर्वीच या डीलला मोठा धक्का बसला आहे. होंडा, निस्सान आणि मित्सुबिशी या तीन कंपन्यांचे विलिनीकरण केले जाणार होते. परंतू, आता या डीलमधून मित्सुबिशीने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
वाहन क्षेत्रातील मोठी घडामोड येत्या काळात होऊ घातली आहे. एकीकडे फोक्सवॅगन सारखी जगातील एक नंबरची जर्मन कंपनी आपल्या देशातील प्लांट एकामागोमाग एक बंद करत असताना जपानच्या तीन कंपन्यांमध्ये मोठ्या हालचाली सुरु झाल्या होत्या. ऑटोमोबाईल क्षेत्रातील वाढत्या आव्हानांना तोंड देण्यासाठी, चिनी कंपन्यांचे आव्हान मोडीत काढण्यासाठी जपानच्या तीन कंपन्यांचे विलिनीकरण होण्याची शक्यता होती. जपान हा जगातील सर्वात मोठा वाहन निर्माण करणारा देश आहे. या देशातील कंपन्यांना चीनकडून आव्हान मिळू लागल्याने या कंपन्यांनी धास्ती घेतली आहे.
एकमेकांसोबत स्पर्धा करण्यापेक्षा विलिनीकरण करण्याचा विचार या कंपन्यांत सुरु आहे. यामुळे खर्च कमी होणार असून नफ्यात वाढ होणार आहे. सध्या या कंपन्यांचे बाजारमुल्य ५० अब्ज डॉलर एवढे आहे. मित्सुबिशीने सुरुवातीला आपण या डीलमधील आपल्या स्थानाचे अवलोकन करणार असल्याचे म्हणत सावध पवित्रा घेतला होता. परंतू, या डीलमध्ये कंपनीला दुय्यम स्थान असल्याचे लक्षात आल्यावर या डीलमधून बाहेर पडण्याचा मार्ग कंपनीने स्वीकारला आहे.
जपानी वृत्तपत्र योमिउरीनुसार मित्सुबिशीने विलीनीकरणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. होंडा आणि निसानच्या विलीनीकरणातून स्थापन झालेली कंपनी उद्योगातील सर्वात मोठ्या कार कंपन्यांपैकी एक बनेल. जपानी कार निर्माता कंपनी मित्सुबिशीने होंडा आणि निसानला नव्याने स्थापन झालेल्या होल्डिंग कंपनीत सामील होण्याचा विचार केला होता. या वृत्ताचे कंपनीने खंडण केलेले नाही. एक निवेदन सादर करत कंपनी अजूनही पर्यायांचे मूल्यांकन करत असल्याचे म्हटले आहे.
निसान ही मित्सुबिशीमध्ये २४ टक्के हिस्सा असलेली सर्वात मोठी शेअरहोल्डर आहे. यामुळे मित्सुबिशीच्या या निर्णयाचा कितपत परिणाम होणार याकडे ऑटो क्षेत्राचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे फ्रान्सची कंपनी रेनोकडे निस्सानचे १५ टक्के शेअर्स आहेत. होंडाला रेनो कंपनीने या विलिनीकरणात सहभागी व्हावे असे वाटत नाहीय. दुसरीकडे, फ्रेंच ऑटोमेकर रेनोचा निसानमध्ये १५ टक्के हिस्सा आहे मित्सुबिशी या डीलवर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.
रेनोच्या माजी प्रमुखांचा होंडावर मोठा दावा...
होंडा निसान आणि मित्सुबिशीचे गुप्त अधिग्रहण करू इच्छित आहे, असा दावा रेनॉल्टचे माजी प्रमुख कार्लोस घोसन यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये केला होता. होंडा इतर दोन जपानी ब्रँडपेक्षा मोठी आहे. यामुळे होंडा अन्य छोट्या कंपन्यांवर नियंत्रण मिळविण्याच्या स्थितीत येते, असे त्यांचे म्हणणे होते.