ऑटो क्षेत्रातील सर्वात मोठी घडामोड होऊ घातलीय; होंडा, निस्सान, मित्सुबिशीमध्ये हालचाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 13:06 IST2024-12-18T13:04:53+5:302024-12-18T13:06:00+5:30
Honda Nissan Merger: चीनच्या ईव्ही क्षेत्रातील आव्हानामुळे या दोन कंपन्यांना विलिनीकरण करण्यास भाग पाडले आहे. जपान हा जगातील सर्वात मोठा वाहन निर्माण करणारा देश आहे. या देशातील कंपन्यांना चीनकडून आव्हान मिळू लागल्याने या कंपन्यांनी धास्ती घेतली आहे.

ऑटो क्षेत्रातील सर्वात मोठी घडामोड होऊ घातलीय; होंडा, निस्सान, मित्सुबिशीमध्ये हालचाली
वाहन क्षेत्रातील मोठी घडामोड येत्या काळात होऊ घातली आहे. एकीकडे फोक्सवॅगन सारखी जर्मन कंपनी आपल्या देशातील प्लांट एकामागोमाग एक बंद करत असताना जपानच्या तीन कंपन्यांमध्ये मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रातील वाढत्या आव्हानांना तोंड देण्यासाठी, चिनी कंपन्यांचे आव्हान मोडीत काढण्यासाठी जपानच्या तीन कंपन्यांचे विलिनीकरण होण्याची शक्यता आहे.
जपानच्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी असलेल्या होंडा आणि निस्सान मोटर या कंपन्यांमध्ये विलिनीकरणाची चर्चा सुरु झाली आहे. चीनच्या ईव्ही क्षेत्रातील आव्हानामुळे या दोन कंपन्यांना विलिनीकरण करण्यास भाग पाडले आहे. जपान हा जगातील सर्वात मोठा वाहन निर्माण करणारा देश आहे. या देशातील कंपन्यांना चीनकडून आव्हान मिळू लागल्याने या कंपन्यांनी धास्ती घेतली आहे.
रॉय़टर्सच्या वृत्तानुसार या दोन कंपन्यांची मिळून एक होल्डिंग कंपनी बनविण्याबाबत चर्चा सुरु आहे. यामध्ये तिसरी कंपनी मित्सुबिशी मोटरला देखील सहभागी केले जाण्याची शक्यता आहे. एकमेकांसोबत स्पर्धा करण्यापेक्षा विलिनीकरण करण्याचा विचार या कंपन्यांत सुरु आहे. यामुळे खर्च कमी होणार असून नफ्यात वाढ होणार आहे. सध्या या कंपन्यांचे बाजारमुल्य ५० अब्ज डॉलर एवढे आहे.
असे झाले तर ऑटोमोबाईल क्षेत्रातील ही सर्वात मोठी घडामोड ठरणार आहे. या विलिनीकरणाचा सर्वाधिक फायदा हा निस्सानला होणार आहे. गेल्याच महिन्यात कंपनीने ९००० कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता. तसेच उत्पादनात २० टक्क्यांची कपात केली होती. होंडा चांगल्या परिस्थितीत आहे. मार्चमध्येच या कंपन्यांनी एकत्रित ईव्ही वाहनांच्या उत्पादनावर स्ट्रटेजिक पार्टनरशिप करण्याचे संकेत दिले होते. परंतू, आता गोष्ट विलिनीकरणापर्यंत आली आहे.
चीनमध्ये पेट्रोल, डिझेल कारपेक्षा ईव्ही कारकडे लोकांचा ओढा वाढला आहे. ही डील झाली तर त्याचे तोटेही आहेत. लाखो लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात. या बातमीनंतर निस्सान आणि मित्सुबिशीच्या शेअरमध्ये २० टक्क्यांची उसळी आली असून होंडाच्या शेअरमध्ये २ टक्क्यांची घसरण झाली आहे.