होंडा इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये करणार धमाका, पुढील ५ वर्षांसाठी कंपनी आखतेय नवा प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 15:37 IST2025-02-10T15:34:42+5:302025-02-10T15:37:07+5:30
यावर्षीच्या ऑटो एक्स्पो २०२५ मध्ये होंडाने आपल्या दोन नवीन टू-व्हीलर लाँच केल्या आहेत.

होंडा इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये करणार धमाका, पुढील ५ वर्षांसाठी कंपनी आखतेय नवा प्लॅन
नवी दिल्ली : होंडा (Honda) कंपनीने आधीच इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे. कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांनाही खूप लोकप्रियता मिळाली आहे. अॅक्टिव्हा इलेक्ट्रिक बाजारात येण्यापूर्वी होंडाने इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे. यावर्षीच्या ऑटो एक्स्पो २०२५ मध्ये होंडाने आपल्या दोन नवीन टू-व्हीलर लाँच केल्या आहेत. होंडा अॅक्टिव्हा इलेक्ट्रिक आणि क्यूसी १ या दोन्ही गाड्या बाजारात आल्या आहेत.
रिपोर्टनुसार, होंडा भारतात ईव्ही उत्पादन प्रकल्प उभारण्याची योजना आखत आहे, जो २०२८ मध्ये सुरू होऊ शकतो. कंपनीने पुढील ५ वर्षांसाठी तयारी केली आहे. येत्या ५ वर्षांत कंपनी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करणार आहे. होंडाच्या १० नवीन इलेक्ट्रिक गाड्या भारतीय बाजारात येऊ शकतात. यापैकी चार वाहने पुढील दोन वर्षांत लाँच केली जाऊ शकतात. होंडा आपल्या वाहनांच्या निर्मितीसाठी भारतात एक प्लांट स्थापन करणार आहे.
भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेता कंपनीने हा निर्णय घेतला आहे. येत्या काही वर्षांत भारत ईव्ही हब बनू शकते, असे कंपनीचे म्हणणे आहे. दरम्यान, २०२५ ते २०२७ या काळात होंडा कोणती वाहने लाँच करणार आहे, हा प्रश्न तुम्हाल पडला असेल. तर कंपनीने अद्याप त्याबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. मात्र, कंपनी दरवर्षी ४ मॉडेल बाजारात आणू शकते. यासह, तीन लाख युनिट्सच्या विक्रीचे टारगेट ठेवले जाऊ शकते. होंडाचे हे टारगेट नवीन वाहनाच्या विक्रीबाबत असू शकते.
होंडा इलेक्ट्रिक स्कूटर्स
होंडा कंपनीने बाजारात अॅक्टिव्हा इलेक्ट्रिक आणि QC1 लाँच करून आपली ग्रँड स्कीमची सुरूवात केली आहे. कंपनीने आपले हे मॉडेल्स लिमिटेड फीचर्ससह बाजारात आणले आहेत. परंतु येणाऱ्या नवीन मॉडेल्समध्ये अॅडव्हॉन्स फीचर्स असू शकतात.