'ही' स्वदेशी कंपनी आणतेय नवी Electric Bike; १५० किमीची रेंज, मिळणार भन्नाट फीचर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 09:12 PM2022-01-29T21:12:03+5:302022-01-29T21:12:20+5:30
कंपनी Electric Scooter देखील करणार लाँच. पाहा कोणते असतील फीचर्स.
इलेक्ट्रीक वाहन उत्पादक कंपनी Hop Electric नं एक मोठी घोषणा केली आहे. कंपनी एक हाय-स्पीड इलेक्ट्रीक मोटरसायकल लाँच करणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं. या बाईकचं नाव Hop OXO असं ठेवण्यात येणार आहे. यासोबतच हायस्पीड इलेक्ट्रीक स्कूटरही लाँच केली जाणार असल्याची घोषणा कंपनीनं केली आहे. इलेक्ट्रीक मोटरसायकलची रेंज 150 किमीपर्यंत असेल, तर स्कूटरची रेंज 120 किमीपर्यंत असू शकते. जयपूर-आधारित EV कंपनी त्याच्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या LYF इलेक्ट्रीक स्कूटरचे पुढील अपग्रेड देखील विकसित करत आहे. या स्कूटरद्वारे 125 किमीची रेंज मिळण्याचा दावा करण्यात येत आहे.
नव्या इलेक्ट्रीक बाईकच्या लाँचची तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. "इलेक्ट्रीक वाहनांची मागणी वाढत असल्याने तरुण अधिक प्रीमियम पर्याय शोधत आहेत. हे लक्षात घेऊन, आम्ही लवकरच आमची पहिली ई-बाईक, Hop OXO आणि एक हाय-स्पीड इलेक्ट्रीक स्कूटर लाँच करणार आहोत," अशी प्रतिक्रिया होप इलेक्ट्रीक मोबिलिटीचे सह-संस्थापक आणि सीईओ केतन मेहता यांनी दिली.
कंपनीने होप एनर्जी नेटवर्क सेटअप करण्याची आपली योजना देखील जाहीर केली. याद्वारे ग्राहकांना बिल्ट इन बॅटरी सर्व्हिसेस तसेच चार्जिंग स्टेशनची सुविधाही देण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकांना त्याच्या बाईकची डिस्चार्ज झालेली बॅटरी केवळ ३० सेकंदात पूर्णपणे चार्ज झालेल्या बॅटरीने बदलण्यास मदत मिळणार असल्याचंही कंपनीनं सांगितलं.
300 शहरांमध्ये रिटेल स्टोअर्स
10 नव्या शहरांना जोडण्यासोबतच होपचे आता संपूर्ण भारतात 12 राज्यांमध्ये 54 एक्सक्लुसिव्ह एक्सपिरिअन्स सेंटर्स आहेत. कंपनीची योजना या वर्षी देशभरात विस्तार करण्याची आहे. 2022 पर्तं 300 पेक्षा अधिक शहरांमध्ये आपली उपस्थिती नोंदवण्याचीही कंपनी योजना आखत आहे.