अबब...तीन लाखांच्या बाईकचे पहिले सर्व्हिस बिल 9 हजार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 12:12 PM2018-10-30T12:12:01+5:302018-10-30T12:12:59+5:30
300 सीसी बाईक एका ग्राहकाने नुकतीच 2100 किमीनंतर पहिल्या सर्व्हिसिंगला दिली होती.
BMW G310R ही स्वस्तातली बाईक पुन्हा एकदा चर्चेत आली असून पहिल्या सर्व्हिसिंगचे बिल पाहून ग्राहकाचे डोळे पांढरे झाले आहेत.
बीएमडब्ल्यूने कमी किंमतीत G310R ही धाकड बाईक भारतातील सामान्य ग्राहकांसाठी लाँच केली खरी मात्र या बाईकच्या पहिल्या सर्व्हिसिंगचे बिल पाहिल्यावर बाईकची जादाची किंमत वसूल करत असल्याचे दिसत आहे.
G310R ही 300 सीसी बाईक एका ग्राहकाने नुकतीच 2100 किमीनंतर पहिल्या सर्व्हिसिंगला दिली होती. मात्र जेव्हा तो बाईक आणायला सर्व्हिस सेंटरमध्ये गेला तेव्हा बिल पाहून हादरलाच. एखाद्या प्रिमिअम कारच्या पहिल्या सर्व्हिसिंगएवढे 9,257 रुपयाचे बिल त्याच्या हातावर ठेवण्यात आले.
हे बिल दोन भागात त्याला देण्यात आले. पहिल्या भागात बाईकचे बदललेले पार्ट आणि दुसऱ्या भागात लेबर चार्ज आकारण्यात आला आहे. यामुळे इतर कंपन्यांसारखे BMW पहिल्या काही सर्व्हिस मोफत देत नसल्याचे स्पष्ट होते. ऑईल फिल्टरसाठी 324 रुपये, गॅस्केट रिंग 50 रुपये हा जुजबी खर्च सोडता इंजिन ऑईलसाठी 1996 रुपये आकारले आहेत. या किंमती 18 टक्के जीएसटी अंतर्भूत आहेत. मात्र, धक्का तेव्हा बसला जेव्हा चेन साफ करण्यासाठी क्लीनर आणि स्प्रेसाठी चक्क 2627 रुपये आकारण्यात आले आहेत. तसेच 1794 रुपयांचा लेबर चार्ज केवळ तपासणीसाठी आकारण्यात आला आहे आणि सामान्य लेबर चार्ज 897 रुपये आकारला आहे.
एवढा चार्ज आकारुनही BMW ने 1569 रुपये बाईक सफाईसाठी आकारले आहेत. म्हणजे हिशोब घातल्यास 4000 रुपये केवळ चेन सफाईसाठी आकारले आहेत. यासाठी जास्तीतजास्त 500 रुपये आकारले जातात. केटीएम ड्युक 390 सीसीचे पहिल्या सर्व्हिसिंगचे बिल 1500 रुपयांच्या आत असते.
अशा प्रकराची लूट बीएमडब्ल्यूच्या डिलरकडून अन्य ग्राहकांचीही होत आहे. कंपनी मोठी असली तरीही 300 सीसीसाठी इतर कंपन्यांच्या तुलनेत 1 लाख रुपयांनी या बाईकची किंमत जास्त ठेवण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे कंपनी 6999 रुपयांच्या इएमआयमध्ये G310R ही बाईक विकत आहे.