ईव्ही स्कूटरना आग कशी लागली? ओला, ओकिनावा, प्युअरला केंद्राच्या नोटीसा; कठोर कारवाईचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 03:39 PM2022-07-05T15:39:00+5:302022-07-05T15:39:18+5:30
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वीच या वाहन कंपन्यांना कठोर कारवाई करण्याचा इशारा दिलेला होता. जर या गोष्टी पाळल्या गेल्या नाहीत, तर सर्व खराब वाहने रिकॉल करण्याचे आदेश दिले जातील, असे ते म्हणाले होते.
केंद्र सरकारने ओला ईलेक्ट्रीक, ओकिनावा आणि प्युअर ईव्हीसह ज्या ज्या कंपन्यांच्या ईलेक्ट्रीक वाहनांना आगी लागल्या आहेत, त्यांना कारणे दाखवा नोटीसा पाठविल्या आहेत. यामध्ये ईलेक्ट्रीक वाहनांना लागलेल्या आगींवरून प्रश्न विचारण्यात आले आहेत. याचबरोबर खराब ईलेक्ट्रीक वाहने विकल्यामुळे त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई का करू नये, असाही सवाल विचारण्यात आला आहे.
या ईलेक्ट्रीक वाहन निर्मात्यांना नोटीशीला उत्तर देण्यासाठी जुलैच्या अखेरपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. उत्तर मिळाल्यानंतर सरकार या कंपन्यांवर कोणत्याप्रकारची कारवाई करायची याचा निर्णय घेणार आहे. रस्ते परिवाहन आणि राजमार्ग मंत्रालय देखील या आगीच्या घटनांशी संबंधीत उत्तराची वाट पाहत आहे.
सेंट्रल कंज्यूमर प्रोटेक्शन अथॉरिटी (सीसीपीए)ने गेल्या महिन्यात प्युअर ईव्ही आणि बुम मोटर्सला नोटीस पाठविली होती. सरकारी तपासणीमध्ये या ईलेक्ट्रीक स्कूटरच्या बॅटरी सेल आणि डिझाईनमध्ये त्रुटी असल्याचे समोर आले आहे. अशाचप्रकारच्या त्रुटी डीआरडीओला देखील सापडल्या होत्या. ओला इलेक्ट्रीक, ओकिनावा ऑटोटेक, प्युअर ईव्ही, जितेंद्र इलेक्ट्रीक आणि बुम मोटर्सद्वारे ज्या बॅटरी वापरण्यात आल्या आहेत, त्यामध्ये खर्च कमी करण्यासाठी कमी गुणवत्तेचे साहित्य वापरण्यात आले आहे, असे डीआरडीओला आढळले होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वीच या वाहन कंपन्यांना कठोर कारवाई करण्याचा इशारा दिलेला होता. जर या गोष्टी पाळल्या गेल्या नाहीत, तर सर्व खराब वाहने रिकॉल करण्याचे आदेश दिले जातील, असे ते म्हणाले होते.