टाटा नेक्सॉन ईव्हीच्या बॅटरीची किंमत किती? ग्राहक ऐकून चक्रावला, त्यात...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 01:32 PM2022-07-15T13:32:56+5:302022-07-15T13:33:16+5:30
एका नेक्सॉन ईव्ही ग्राहकाची बॅटरी दोन वर्षांतच खराब झाली होती, त्याला ती बॅटरी रिप्लेस करावी लागली.
सध्या देशात इलेक्ट्रीक कारच्या किंमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. असे असताना टाटाची एक कार या सेगमेंटमध्ये धुमाकुळ घालत आहे. टाटा नेक्सॉन ईव्हीने सर्वांना भुरळ पाडली आहे. आता तर जादा रेंजची कार टाटाने आणली आहे. एवढेच नाही तर प्रिमिअम हॅचबॅक अल्ट्रॉजचे ईलेक्ट्रीक व्हर्जनही टाटाने बाजारात आणण्याची तयारी सुरु केली आहे. असे असताना एका नेक्सॉन ईव्ही ग्राहकाची बॅटरी दोन वर्षांतच खराब झाली होती, त्याला ती बॅटरी रिप्लेस करावी लागली. यावेळी त्याला डीलरने बॅटरीची किंमत जेव्हा सांगितली तेव्हा त्याला जवळजवळ भोवळ यायचीच बाकी होती.
एका नेक्सॉन ईव्हीच्या मालकाने सोशल मीडियावर याबाबत सांगितले आहे. विविध प्रसारमाध्यमांमधील बातम्यांनुसार या मालकाने बॅटरीची किंमत ७ लाख रुपये असल्याचे म्हटले आहे. त्याला ही किंमत त्याच्या डीलरने सांगितली. टाटा बॅटरीवर सात वर्षांची वॉरंटी देते. यामुळे या ग्राहकाला ती फुकटच बदलून मिळाली आहे.
या ग्राहकाने टाटा नेक्स़ॉन कार दोन वर्षांत ६८ हजार किमी चालविली होती. टाटाच्या बॅटरीची लाईफ यापेक्षा जास्त आहे. बॅटरीची चार्ज-डिस्चार्ज सायकल, चार्जिंग टेम्परेचर, चार्जर कॅपॅसिटीसह अनेक गोष्टींचा यावर परिणाम होतो. या ग्राहकाने ही कार दिवसाला ५० किमी एवढी दररोज चालविली असणार आहे. यामुळे त्याचे एवढे किमी झाले आहेत.
या कार मालकाने बॅटरीची जी किंमत सांगितली आहे, त्यात मारुतीची डिझायर येऊ शकते. किंवा अन्य कार येऊ शकतात. टाटाने या किंमतीबाबत खुलासा केलेला नाही. भारतात बॅटरी बनत नाहीत, यामुळे हे तंत्रज्ञान बाहेरून आणावे लागते. यामुळे याची किंमत जास्त असते.