कार किती सुरक्षित? Bharat NCAP वाहनांवर क्यूआर कोड चिकटवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 05:19 PM2024-08-31T17:19:47+5:302024-08-31T17:20:08+5:30
ज्या कंपन्यांनी त्यांची कार भारत एनकॅपकडे पाठविली आहे व ज्यांची टेस्ट झाली आहे त्या कंपन्यांना भारत एनकॅप हे क्यूआर कोड पाठविणार आहे.
भारतीयांसाठी सुरक्षित वाहने कोणती हे सांगण्यासाठी क्रॅश टेस्ट करणाऱ्या भारत एनकॅपची सुरुवात झाली आहे. काही गाड्यांची क्रॅश टेस्टही झाली आहे. या गाड्यांना किती सेफ्टी रेटिंग आहे हे ग्राहकांना समजण्यासाठी Bharat NCAP ने क्यू आर कोड स्टीकर जारी केला आहे. या गाड्यांवर यापुढे हा क्यू आर कोड असणार आहे. तो स्कॅन केला की त्या गाडीची सेफ्टी रेटिंग येणार आहे.
ज्या कंपन्यांनी त्यांची कार भारत एनकॅपकडे पाठविली आहे व ज्यांची टेस्ट झाली आहे त्या कंपन्यांना भारत एनकॅप हे क्यूआर कोड पाठविणार आहे. यामध्ये वाहन निर्मात्याचे नाव, वाहन किंवा मॉडेलचे नाव, चाचणीची तारीख आणि प्रौढ आणि लहान मुलांसाठी सुरक्षा स्टार रेटिंगसह संपूर्ण माहिती असणार आहे.
भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (एनसीएपी) Bharat New Car Assessment Program (Bharat NCAP) मध्ये वाहन उत्पादक या कार्यक्रमांतर्गत ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड (AIS) 197 नुसार स्वेच्छेने त्यांच्या वाहनांची चाचणी घेऊ शकतात. वाहनांना त्यांच्या चाचणी आणि कार्यक्षमतेच्या आधारे प्रौढ प्रवासी (AOP) आणि लहान मुलांसाठी (COP) स्टार रेटिंग दिले जाणार आहे.
भारत एनकॅप हा एक ग्राहक केंद्रीत मंच असणार आहे. जो ग्राहकांना सुरक्षित कारची निवड करणे, सुरक्षित वाहने बनविण्यासाठी कंपन्यांमध्ये हेल्दी प्रतिस्पर्धा वाढविणे आणइ नवीन नियमांवर वाहने अधिकाधिक सुरक्षित करणे आदी सेवा देण्यास मदत करणार आहे.
भारत एनकॅपद्वारे कारची सुरक्षा व्यवस्था ही भारतीय ग्राहकांसाठीच नाही तर भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राला निर्यातीयोग्य वाहने बनविण्यासही महत्वाची ठरणार आहे. या चाचण्या ग्लोबल एनकॅपच्या नियमांसारख्याच असणार आहेत.