टाटाची फाईव्ह स्टारवाली नेक्सॉन कशी आहे? वाचा Review
By हेमंत बावकर | Published: September 16, 2019 09:56 AM2019-09-16T09:56:40+5:302019-09-16T10:39:46+5:30
टाटा मोटर्सने दोन वर्षांपूर्वी कॉम्पॅक्ट एसयुव्ही लाँच केली. सुरुवातीला 4 स्टार सुरक्षा मिळविणाऱ्या या कारमध्ये बदल करण्यात आले. लोकमतच्या टीमने ही कार खड्ड्यांचे, चकचकीत रस्त्यांवर 600 किमी चालविली.
टाटा मोटर्सने दोन वर्षांपूर्वी कॉम्पॅक्ट एसयुव्ही लाँच केली. सुरुवातीला 4 स्टार सुरक्षा मिळविणाऱ्या या कारमध्ये बदल करण्यात आले आणि देशातील पहिली फाईव्ह स्टार सुरक्षा मानांकन मिळविणारी कार बनली. टाटा मोटर्सने गेल्या चार वर्षांत कार निर्मितीमध्ये मोठे बदल केले आहेत.
नेक्सॉन ही कॉम्पॅक्ट एसयुव्ही पाच व्हर्जनमध्ये लाँच करण्यात आली आहे. XE, XM, XT+, XZ आणि XZ+ मध्ये ड्युअल टोन रूफ आणि अॅटोमॅटीक ट्रान्समिशन अशा प्रकारात लाँच करण्यात आली आहे. एक्सशोरुम किंमत 6.36 ते 10.80 लाख रुपयांपर्यंत आहे. भारतात सुरक्षेला प्राधान्य दिले जात नव्हते. मात्र, टाटा मोटर्सने पहिल्यांदा कुटुंबाच्या सुरक्षेकडे पाहत ऑटो इंडस्ट्रीला नवीन रस्ता दाखविला आहे.
टाटा मोटर्सकडे मारुतीच्या ब्रिझा, फोर्डच्या इकोस्पोर्टला टक्कर देणारी कार नव्हती. नेक्सॉनमुळे ही पोकळी भरून निघाली. नेक्सॉन दिसायला स्पोर्टी असून तेवढेच दमदार इंजिन 1.2 लीटर पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेलमध्ये देण्यात आले आहे. डिझेल इंजिनची कार लोकमतच्या टीमने चालविली. घाटामध्ये ट्रॅफिक जाममध्येही कारने दम तोडला नाही. चढणीला कार योग्य ताकद लावत पुढे जात होती. सारखे गिअर बदलावे लागले नाहीत. तसेच खड्ड्यांचे रस्ते, उंचसखल भागातही कारने चांगला परफॉर्म केला. खड्ड्यांचे धक्के आतमध्ये जाणवत नव्हते. ग्राऊंड क्लिअरन्सही मोठा आहे.
पुण्यासारख्या वाहतूक कोंडीमध्येही कारने नाऊमेद केले नाही. सेकंड गिअरमध्येही कारने वाहतूक कोंडीत पिकअप घेतला. यामुळे सारखे गिअर बदलण्याचा त्रास वाचतो. एक्स्प्रेस हायवेला वेगामध्ये वळणावरही कार चांगला तोल सांभाळत होती. या जवळपास 600 किमीच्या प्रवासादरम्यान कारने 21-22 चे मायलेज दिले. पेट्रोल मॉडेलसाठी 15 ते 17 पर्यंत मायलेज मिळण्याची शक्यता आहे.
इन्फोटन्मेंट सिस्टिम 6.5 इंचाची टचस्क्रीन, एलईडी डीआरएल, रिअर एसी व्हेंट, इको- सिटी- स्पोर्ट असे ड्रायव्हिंग मोड्समुळे कार चालविण्याचा आनंद लुटता येतो. कारमध्ये लेग स्पेस चांगली आहे. शिवाय बॅगा ठेवण्यासाठी बूट स्पेसही मोठी आहे. एखाद्या मोठ्या टूरसाठी चार ते पाच जणांच्या बॅगा आरामात राहू शकतात.
रिव्हर्स गिअर कसा टाकावा?
अन्य कारपेक्षा या कारचा रिव्हर्स गिअर वेगळा आहे. गिअर बारला एक आडवा नॉब आहे. रिव्हर्स गिअर टाकायचा असल्यास, दोन बोटांनी तो नॉब वर खेचून गिअर टाकावा लागतो.
सुरक्षेसाठी काय?
सुरक्षेसाठी दोन एअर बॅग, आयसोफिक्स चाईल्ड सीट माऊंट, एबीएस-ईबीडी आणि कॉर्नर स्टॅबिलीटी कंट्रोल, रिव्हर्स पार्किंग असिस्ट सारखे फिचर देण्यात आले आहे. मजबूत बांधणीमुळे कार आणखी सुरक्षित करण्यात आली आहे.
पाहा कसे मिळाले Nexon ला Globle NCAP मध्ये पाच स्टार...!