टायरमध्ये हवेचे प्रेशर किती असावे? इंधन वाचेलच पण जीव देखील...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 02:42 PM2022-08-26T14:42:54+5:302022-08-26T14:45:32+5:30
Car, bike Care Tips: प्रत्येक आठवड्याला टायरमध्ये हवा भरत जा. पैसे लागत नाहीत, पेट्रोल पंपांवर फुकटात हवा भरून दिली जाते. ती सेवाच असल्याने बंधनकारक आहे.
अनेकदा आपण गाडीचे मायलेज कमी झाल्याची तक्रार करतो किंवा ऐकतो. परंतू, त्याचे कारण काय आहे हे पाहत नाही. अनेकांच्या गाड्या एकाच जागी दिवसेंदिवस उभ्या असतात. काहींच्या फिरतही असतात. परंतू, टायरमधील हवा जी असते ती हळू हळू दाबामुळे कमी कमी होऊ लागते, याकडे लक्षच देत नाही. मग मायलेज कमी होऊ लागते.
आता टायरमध्ये एअर प्रेशर किती असावे यावरून देखील मतभिन्नता आहे. जर तुमची कार आठवडा आठवडा उभी राहत असेल तर प्रत्येक आठवड्याला टायरमध्ये हवा भरत जा. पैसे लागत नाहीत, पेट्रोल पंपांवर फुकटात हवा भरून दिली जाते. ती सेवाच असल्याने बंधनकारक आहे. तेवढेही जमत नसेल तर तुमच्या खिशावर हळूहळू ताण वाढू लागतो आणि कधी कधी जिवावर देखील बेतू शकते.
तुमच्या गाडीमध्ये जास्त माणसे किंवा साहित्य असेल तर टायरमधील हवेचे प्रेशर वेगळे ठेवावे लागते. मध्यम वजन असेल तर मध्यम प्रेशर आणि जर तुम्ही एकटेच कार मधून जात असाल तर कमी. परंतू आपण सरकरट एकच एअर प्रेशर ठेवतो आणि फसतो. खूप कमीही असून नये आणि जास्तही. कारण कमी असल्याने किंवा जास्त असल्याने टायर फुटून अपघाताची शक्यता असते. कमी असले तर गाडी पिकअप घेताना जास्त ताकद लावते तसेच टायरचीही झिज होते. यामुळे इंधन जास्त जाळले जाते.
हवा जास्त असेल तर गाडी रस्त्याला धरून चालत नाही. टायर तापल्याने फुटण्याची शक्यताही असते. तसेच सस्पेन्शनही मार खाते. हे झाले फाय़दे तोटे. साधारणपणे ३० ते ३२ किंवा ४० पीएसआय असे टायरचे प्रेशर त्या त्या गाडीच्या प्रकारावर अवलंबून असते. याचा तक्ता तुम्हाला ड्रायव्हरच्या दरवाजा उघडला की आतील बॉडीवर दिलेला असतो. जर तुम्ही हवा चेक करत असाल तर थोडे थांबा आणि मग तपासा. कारण टायर तापलेला असेल तर आतील हवाही तापून प्रसरण पावलेली असते. यामुळे चुकीचे पीएसआय मिळते. हवा कमी केली तर जेव्हा टायर थंड होतो, तेव्हा कमी पेक्षाही कमी प्रेशर असते.