Humble One Solar Electric Car: अफलातून! सूर्याच्या किरणांवर चालणार ही इलेक्ट्रीक कार; फुल चार्जमध्ये मुंबई-पुणे-मुंबई तीनदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 16:06 IST2022-04-06T16:03:22+5:302022-04-06T16:06:35+5:30
Humble One Solar Electric Car: जगातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी कार बनली आहे. बुकिंगसाठी २२००० रुपये, किंमत आणि रेंज जाणून घ्या...

Humble One Solar Electric Car: अफलातून! सूर्याच्या किरणांवर चालणार ही इलेक्ट्रीक कार; फुल चार्जमध्ये मुंबई-पुणे-मुंबई तीनदा
पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढत असल्याने आता पर्यायी इंधनाकडे लोक वळू लागले आहेत. इलेक्ट्रीक आणि हायड्रोजन कार आता भारताच्या रस्त्यांवरही धावू लागल्या आहेत. असे असताना आता सौर उर्जेवर चालणारी कार प्रत्यक्षात आली आहे. कंपन्या आता सूर्याच्या किरणांनी चालता चालताच कारची बॅटरी चार्ज करण्याच्या तंत्रज्ञान विकसित करू लागल्या आहेत.
कॅलिफोर्नियाची कंपनी हंबल मोटर्सने ही सौर ऊर्जेवर चालणारी कार बनविली आहे. हंबल वन (Humble One) असे या कारचे नाव असून तिच्या छतावर सोलार पॅनल लावलेले असणार आहे. त्यावर सूर्याची किरणे पडली की गाडीची बॅटरी चार्ज होणार आहे.
या कारची किंमत तशी महागच असणार आहे. जवळपास ८० लाख रुपये असेल. ही गाडी बुक करण्यासाठी २२००० रुपये आकारले जात आहेत. कंपनीने गेल्या २ वर्षांत या कारवर काम केले आहे. ही जगातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी कार बनली आहे.
या कारचे उत्पादन २०२४ मध्ये सुरु होणार आहे. तर २०२५ मध्ये डिलिव्हरी सुरु होतील. या कारला इलेक्ट्रीक कारच्या जगतातील मोठा आविष्कार असल्याचे म्हटले जात आहे. हंबल वन ही पाच सीटर एसयुव्ही आहे. या कारच्या छतावर फोटोवोल्टेइक सेलचा 82.35 स्क्वेयर फीटचा सोलर पॅनल आहे. या कारची मोटर 1020hp ताकद निर्माण करते.
महत्वाची बाब म्हणजे या कारची रेंजही खतरनाक आहे. ही कार विजेवर देखील चार्ज करता येणार आहे. एका चार्जमध्ये ही कार 805 किमीची रेंज देते, तर सौर ऊर्जेवर ही कार जवळपास 96 km पर्यंत चालविता येते. यासाठी खास मोड देण्यात आला आहे.