आज लाँच होणार Hyundai ची शानदार सेफ्टी फीचर्स असलेली कार, Fronx आणि Punch ला देणार टक्कर!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 09:57 AM2023-07-10T09:57:23+5:302023-07-10T09:58:01+5:30
ह्युंदाईच्या कारचे फीचर्स आणि किंमत याबद्दल माहिती जाणून घ्या...
नवी दिल्ली : सध्या ऑटो मार्केटमध्ये एसयूव्हीला ( SUV) मोठी मागणी आहे. या सेगमेंटमधील कारची मागणी झपाट्याने वाढत आहे. यातच आता कोरियन कार उत्पादक कंपनी ह्युंदाई (Hyundai) आपली सर्वात छोटी एसयूव्ही रस्त्यावर आणण्यासाठी सज्ज आहे. दरम्यान, कंपनीने ही कार आधीच डिजिटल पद्धतीने सादर केली होती. मात्र, आज गुरुग्राममधील एका कार्यक्रमात ही कार भारतात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. कंपनी आपली नवीन एसयूव्ही एक्स्टर (SUV Exter) घेऊन येत आहे. Exeter SUV ही कार टाटा पंच आणि मारुती सुझुकी फ्रँक्सला टक्कर देईल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ह्युंदाईच्या आगामी कारचे फीचर्स आणि किंमत याबद्दल माहिती जाणून घ्या...
पॉवरट्रेन
रिपोर्ट्सनुसार, Hyundai Exter मध्ये तुम्हाला 1.2-लीटर VTVT NA पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. हे इंजिन सध्याच्या कार Venue, i20, Grand i10 Nios आणि Aura मध्ये आधीच मिळत आहे. दरम्यान, ह्युंदाई एक्स्टरसाठी इंजिनमध्ये थोडे ट्यून करू शकते. हे इंजिन 82bhp पॉवर आणि 115 Nm टॉर्क जनरेट करू शकते. कार 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT ट्रान्समिशनसोबत कनेक्टेड होऊ शकते.
फीचर्स
स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आगामी कारमध्ये पाहायला मिळणार आहे. प्रत्येक व्हेरिएंटमध्ये 6 एअरबॅग्ज मिळवणारी ही कंपनीची पहिली सब-कॉम्पॅक्ट SUV असेल. कारच्या सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, व्हीकल स्टॅबलिटी मॅनेजमेंट, ESC आणि हिल असिस्ट कंट्रोल यांसारखी इतर फीचर्स देखील कारमध्ये मिळू शकतील.
बुकिंग
जर तुम्हाला ह्युंदाई एक्स्टर खरेदी करायची असेल, या आगामी कारचे बुकिंग आधीच सुरू झाले आहे. म्हणजेच कंपनीच्या अधिकृत साइटवरून तुम्ही स्वतःसाठी ही कार बुक करू शकता. ही कार बुक करण्यासाठी तुम्ही 11,000 रुपये टोकन रक्कम भरून ती बुक करू शकता. कारच्या बेस व्हेरिएंट आणि इतर व्हेरिएंटची किंमत 6 लाख रुपयांवरून 10 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.