Hyundai ने चक्क कुत्र्याला दिली सेल्समनची नोकरी; ग्राहकांचा बनला लाडका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 01:51 PM2024-02-04T13:51:56+5:302024-02-04T13:53:24+5:30
Hyundai Car Showroom: या कुत्र्याची अनोखी गोष्ट सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे.
Hyundai Car Showroom: तुमच्यापैकी अनेकजण कार खरेदी करण्यासाठी शोरुममध्ये गेले असतील. तुम्ही शोरुममध्ये जाता, तेव्हा तुम्हाला तिथे उपस्थित कर्मचारी तुमचे स्वागत करतो आणि तुम्हाला विविध गाड्या दाखवतो. पण, एका आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी Hyundai ने चक्क एका कुत्र्याला सेल्समन म्हणून कामावर ठेवले आहे. तुम्हाला ऐकून धक्का बसेल, पण हे खरंय.
टस्कन प्राइम नावाचा कुत्रा सध्या ह्युंदाईच्या शोरुममध्ये सेल्समन झाला आहे. या मागची कहाणी अतिशय रंजक आहे. ही गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली तेव्हा अनेकांच्या हृदयाला भिडली. या शोरुममध्ये येणारे कर्मचारीदेखील त्या कुत्र्याचे खुप लाड करतात, त्याला खायला घालतात.
कुत्र्याला घेतले दत्तक
टक्सन रस्त्यावरचा कुत्रा(स्ट्रीट डॉग) आहे, ज्याला ह्युंदाई शोरुमने दत्तक घेतले आहे. पूर्वी हा कुत्रा शोरुमभोवती चकरा मारायचा. शोरुमचेचे कर्मचारी त्याला खायला घालू लागले आणि त्याच्याशी खेळू लागले. हळुहळू टक्सनने कर्मचाऱ्यांची मने जिंकली आणि त्यांचे नाते घट्ट झाले आहे. यामुळे ह्युंदाईने त्याला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.
ह्युंदाई आयडी कार्ड
टस्कन आता ह्युंदाई परिवारातील सदस्य झाला आहे. त्याला सामान्य Hyundai शोरुम कर्मचाऱ्यासारखी वागणूक दिली जाते. विशेष म्हणजे, त्याच्याकडे Tucson Prime नावाचे ओळखपत्रदेखील आहे. हा कुत्रा शोरुमचे रक्षण तर करतोच पण सेल्समन म्हणूनही आपले कर्तव्य बजावतो.
या शोरुममध्ये टस्कन तैनात
टक्सनची गोष्ट सोशल मीडियावर बरीच ट्रेंड झाली. आता हे शोरुम कुठे आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या शोरुममधून कार घ्यायची असेल तर ब्राझीलला जावे लागेल. हे शोरूम भारतात नसून ब्राझीलच्या एस्पिरिटो सँटो राज्यातील सेरा येथे आहे. दरम्यान, यापूर्वी ब्राझीलच्याच एका कंपनीने एका मांजरीला कर्मचारी बनवले होते.