ह्युंदाईच्या नव्या 'सँट्रो'चा नामकरणविधी...पहा कोण ठेवणार तिचे नाव...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 04:21 PM2018-08-29T16:21:35+5:302018-08-29T16:23:05+5:30
सँट्रोसारखी कार येणार पण तिचे नाव सँट्रो नसणार आहे. या कारचे नाव ठरवण्यासाठी कंपनीने बारसाच आयोजित केला आहे. यामध्ये जो जिंकेल त्याला बक्षीसे मिळणार आहेत.
मुंबई: ह्युंदाईला भारतीय बाजारपेठेत स्थिरस्थावर करण्यास मदत करणाऱ्या सँट्रो कारची नवी आवृत्ती भारतात पुढील काही महिन्यांत दाखल होणार आहे. या कारचे नाव सँट्रो असणार नाही. याबाबत कंपनीच्या भारतातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच संकेत दिले आहेत. कारसोबतच तिच्या नावाबद्दलही उत्सुकता असली तरीही तिचे सध्याचे तांत्रिक नाव AH2 असे ठेवण्यात आले आहे, तर या कारचे लाँचिंग 23 ऑक्टोबरला होणार आहे. तर या कारचा नामकरणविधीही आयोजित करण्यात आला आहे.
ह्युंदाई इंडियाची स्थापना 1996 मध्ये झाली. यानंतर ह्युंदाईची पहिली कार 1998 मध्ये भारतीय रस्त्यांवर धावू लागली ती सँट्रो. कंपनीने ही कार पलटवून दाखवल्यास १ कोटींचे बक्षीसही जाहीर केले होते. एवढी ही कार बॅलन्स बनविण्यात आली होती. ह्युंदाई येईपर्यंत मारुतीची एकाधिकारशाही होती. मात्र, ह्युंदाईने चांगली बांधणी आणि आकर्षक कार बाजारात आणत मारुतीला धक्का दिला आहे.
The biggest naming ceremony is here. Share the name of the New Contemporary Family Car on https://t.co/yBRzYkwJMk and get a chance to Win the New Hyundai car. Also, 100 Gift vouchers worth Rs 1,000 to be won. Hurry Now! #HyundaiNaamkaranpic.twitter.com/gTaZk94E5N
— Hyundai India (@HyundaiIndia) August 26, 2018
सँट्रो कारच्या यशानंतर ह्युंदाईने आय 10 ही छोटी कार आणली. मात्र, ती भारतीय बाजारपेठेत अपयशी ठरली. यामुळे ही पोकळी भरून काढण्यासाठी पुन्हा सँट्रोसारखी कार आणण्याचे कंपनीने ठरविले आहे. Hyundai Santro (AH2) ही कार गेल्या काही महिन्यांपासून भारतीय रस्त्यांवर ट्रायलसाठी धावताना दिसत होती. यामुळे पुन्हा सँट्रो येणार या बातमीने बाजारातील हवाही चांगलीच गरम झाली आहे. येत्या 23 ऑक्टोबरला या कारवरून पडदा हटविला जाणार आहे.
या नव्या कारमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेवर जास्त भर देण्यात आला आहे. ड्युअल एअरबॅग, एबीएस, इबीडी हे स्टँडर्ड फिचर्स असणार आहेत. कारमध्ये 1.1 लीटर पेट्रोल इंजिन असण्याची शक्यता आहे. 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स सह अॅटोमॅटीक मध्येही येण्याची शक्यता आहे. तसेच स्पर्धा करण्यासाठी कारच्या किमतीही आवाक्यात असणार आहेत.
जुनी सँट्रो आजही रस्त्यांवर दिसत आहे. सार्वजनिक वापराच्या टॅक्सी तसेच खासगी वापरासाठी या कार वापरल्या जात आहेत. यामुळे हा ग्राहक पुन्हा या नव्या सँट्रोकडे वळण्याची शक्यता आहे. ही कार मारुतीच्या वॅगनआरला स्पर्धा करणार आहे.