वाहन चोरीला गेल्यास लगेचच करा 'हे' काम; नाहीतर खरंच पस्तावाल...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 02:32 PM2021-01-24T14:32:22+5:302021-01-24T14:34:10+5:30
Car theft: जेव्हा एखाद्याची कार, दुचाकी चोरीला जाते तेव्हा अनेक मालक अडचणीत सापडतात. कारण त्या वाहनांचे कागदपत्रच अपूर्ण असतात. यामुळे ते विमा कंपनीकडे क्लेमच करू शकत नाहीत.
नवी दिल्ली : आज अनेक ठिकाणी वाहन चोरीला गेल्याच्या घटना कानावर येतात आणि आपल्याही मनात भीती डोकावते. अशावेळी विमा काढलेला असल्यास मोठ्या प्रमाणावर आर्थिक भार कमी होतो. म्हणून विमा खूप महत्वाचा असतो. विमा फक्त अपघात झाल्यावरच उपयोगी नसतो, तर त्याचे अन्य फायदेही असतात. वाहन चोरीला गेल्यावर काय करावे हे अनेकांना समजत नाही. यामुळे वाहनचोरी झाल्यास नंतर धावपळ करण्यापेक्षा आधी काय करावे हे माहिती असणे गरजेचे आहे.
जेव्हा एखाद्याची कार, दुचाकी चोरीला जाते तेव्हा अनेक मालक अडचणीत सापडतात. कारण त्या वाहनांचे कागदपत्रच अपूर्ण असतात. यामुळे ते विमा कंपनीकडे क्लेमच करू शकत नाहीत. याशिवाय वाहन चोरी झाल्यास काय करायला हवे, याची प्रक्रियाच महिती नसल्याने अनेकजण संकटात सापडतात. पण काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्हाला आरामात क्लेम मिळून जातो.
सर्वात आधी कोणती गोष्ट करावी तर इतर ठिकाणी शोधाशोध न करता पोलिसांत जाऊन गुन्हा दाखल करावा. काहीवेळा चुकीच्या ठिकाणी पार्क केली म्हणून वाहन टोचन करूनही नेलेले असू शकते. वाहन चोरी झाल्यास एफआयआर दाखल करावा. पुढील विमा क्लेम प्रक्रियेसाठी हा एफआयआर खूप महत्वाचा असतो.
एफआयआर नोंदविला की लगेचच तुम्हाला तुमच्या विमा कंपनीच्या कॉल सेंटरवर फोन करावा लागणार आहे. तसेच क्लेम फॉर्मदेखील भरावा लागणार आहे. फॉर्ममध्ये तुम्हाला पॉलिसी नंबर, गाडीची माहिती भरावी लागेल. तसेच वाहन चोरीची घटना कुठे झाली, वेळ आदीची सगळी माहिती द्यावी लागेल. याशिवाय वाहन कंपनी तुमच्या गाडीच्या दोन चाव्या मागते. जर तुमच्याकडे एकच चावी असेल तर विमा कंपनी क्लेम नाकारू शकते. यामुळे चाव्या जपून ठेवणे गरजेचे असते.
सेटलमेंट कशी होते?
योग्य़रित्या क्लेम फॉर्म भरल्यानंतर, ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बुक, पॉलिसी डॉक्युमेंट, एफआयआरची कॉपी आणि तुमच्या शहराच्या आरटीओला वाहन चोरीला गेल्याचे दिलेले पत्र विमा कंपनीला द्यायचे असते. पोलीस तुम्ही केलेल्या तक्रारीनुसार तपास करते आणि जर कार सापडली नाही तर नॉन ट्रेसेबल रिपोर्ट जमा करते. यानंतर तुम्हाला गाडीचे आरसी बुक आणि वाहनाची चावी कंपनीला द्यावी लागते. यानंतर कंपनीचा सर्व्हेअर एक अहवाल तयार करतो आणि नंतर विम्याची रक्कम तुमच्या खात्यात वळती केली जाते.