एक दिवस आधी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली; दुसऱ्याच दिवशी स्फोट; अख्खं कुटुंब उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 08:56 PM2022-04-24T20:56:42+5:302022-04-24T20:57:45+5:30
स्कूटरची बॅटरी चार्ज असताना बॅटरीचा स्फोट; संपूर्ण घराला लागली आग
विजयवाडा: इंधनाच्या वाढत्या दरांमुळे इलेक्ट्रिक वाहनांचा खप वाढला आहे. इलेक्ट्रिक वाहनांना सध्या मोठी मागणी आहे. मात्र इलेक्ट्रिक स्कूटर्सना आग लागत असल्याच्या घटना दिवसागणिक वाढत आहेत. त्यामुळे या स्कूटर्सच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
दोनच दिवसांपूर्वी तेलंगणातील निझामाबादमध्ये एका घरात इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट झाला. या स्फोटात ८० वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले. यानंतर Pure EV कंपनीनं आपली २ हजार वाहनं परत मागवली. त्यानंतर आज सकाळी आंध्र प्रदेशच्या विजयवाडा शहरात एका घरात इलेक्ट्रिक मोपेडच्या बॅटरीचा स्फोट झाला. या स्फोटात शिव कुमार (४०) व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याची पत्नी आणि दोन मुलं स्फोटात भाजली. त्यांना गंभीर स्वरुपाची इजा झाली आहे. पत्नीची प्रकृती नाजूक आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिव कुमारनं एक दिवस आधीच बूम मोटर्समधून कॉर्बेट १४ इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली होती. शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास शिव कुमारनं इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी चार्जिंगला लावली. शनिवारी मध्यरात्री ३.३० च्या सुमारास बॅटरीचा स्फोट झाला. थोड्याच वेळात आग संपूर्ण घरात पसरली. त्यात शिव कुमारचा मृत्यू झाला. तर त्याची पत्नी आणि मुलं जखमी झाली. आगीत घरातलं सगळं सामान जळून गेलं.
शिव कुमार डीटीपी ऑपरेटर म्हणून काम करायचा. शिव कुमारची पत्नी हारथी (३०) रुग्णालयात उपचार घेत आहे. तिची अवस्था गंभीर आहे. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी शिव कुमारचा मृत्यू झाला. सध्या पोलीस घटनेचा तपास करत आहेत.