सॅल्यूट! भारतीय लष्कराने बनविले AI आधारित अपघात नियंत्रण यंत्र, लाखोंचे जीव वाचणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 02:10 PM2023-07-25T14:10:28+5:302023-07-25T14:10:51+5:30
भारतातच नाही तर जगभरात रस्ते अपघात हे एक डोकेदुखी ठरले आहेत. कितीही कठोर नियम बनविले, काही जरी केले तरी अपघात काही थांबविता येत नाहीएत.
भारतीय लष्कराने आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने एक महत्वाचे डिव्हाईस बनविले आहे, ज्यामुळे लाखो लोकांचा जीव वाचणार आहे. या डिव्हाईससाठी पेटंटही मिळला आहे. भारतातच नाही तर जगभरात रस्ते अपघात हे एक डोकेदुखी ठरले आहेत. कितीही कठोर नियम बनविले, काही जरी केले तरी अपघात काही थांबविता येत नाहीएत. यामुळे आर्मीचे हे डिव्हाईस खूप दिलासा देणार आहे.
बहुतांश अपघात हे चालकाला डुलकी लागली की होत असतात. यामध्ये दरवर्षी हजारो लोक मृत्यूमुखी पडतात. AI बेस्ड हे डिव्हाईस ड्रायव्हरवर लक्ष ठेवणार आहे. त्याला डुलकी लागली रे लागली की ते अलार्म वाजविणार आहे व चालकाला जागे करणार आहे. या यंत्रामुळे अपघातावर नियंत्रण मिळविण्यास फायदा होणार असल्याचा दावा लष्कराने केला आहे.
भारतीय सैन्य अधिकारी कर्नल कुलदीप यादव यांनी हे उपकरण विकसित केले आहे. 2021 मध्येच त्याच्या पेटंटसाठी अर्ज केला होता, जो आता प्रमाणित झाला आहे. भारतीय लष्कराने सांगितले की त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित अपघात प्रतिबंधक प्रणालीचे पेटंट मिळाले आहे. लष्कराने हे ट्विट करून कळविले आहे. अपघात प्रतिबंधक उपकरण लष्कराच्या संशोधन आणि विकास (R&D) घटकाने विकसित केले आहे, असे आर्मीने म्हटले आहे.
हे उपकरण कोणत्याही वाहनात सहज बसवता येते. वाहनाच्या डॅशबोर्डवर बसवलेले सेन्सर-सुसज्ज उपकरण ड्रायव्हरच्या डोळ्यांवर लक्ष ठेवते आणि जेव्हा तो डोळे बंद करतो तेव्हा त्याला सतर्क करते. यासाठी काही ठराविक वेळ देण्यात आली आहे. या उपकरणाची चाचणी पर्वत, वाळवंट आणि महामार्गांवर वेगवेगळ्या परिस्थितीत करण्यात आली आहे आणि ती पूर्णपणे यशस्वी झाली आहे. आता चाचणीनंतर भारतीय लष्कराच्या सर्व वाहनांमध्ये ही यंत्रणा बसवली जात आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांच्या परिवहन महामंडळांच्या बसमध्ये AI-आधारित यंत्राची चाचणी घेण्यात आली होती.
याचा वापर ट्रकमध्येही करता येणार आहे. मणिपूरमध्ये लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व करताना कर्नल कुलदीप यादव यांच्या मनात हा विचार आला होता. डोंगरात गाडी चालवताना चालक थकतात आणि झोपतात, त्यामुळे अपघाताची शक्यता वाढत होती. 2021 मध्ये देशात रस्ते अपघातात सुमारे 1.54 लाख लोकांचा मृत्यू झाला. एका अहवालानुसार, 57 टक्क्यांहून अधिक ट्रकचे अपघात ड्रायव्हर झोपेमुळे होतात.