बॉण्डपटातील उभयचर कार 'Aquada'ची कमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 11:19 AM2017-08-12T11:19:43+5:302017-08-12T11:20:02+5:30
'अॅक्वाडा' ही गिब्स स्पोर्टस अॅम्फिबियन्स या कंपनीची कार. जमिनीप्रमाणेच अगदी पाण्यातूनही मोटारबोटीसारखी पाणी कापत जाणारी.
जमिनीवर व पाण्यात अशा दोन्ही ठिकाणी राहू शकणाऱ्या प्राण्याला उभयचर असे म्हणतात, पण अशा दोन्ही ठिकाणी ये-जा करू शकेल आपल्या वेगळ्या वैशिष्ट्याने जमिनीवरील रस्त्यावरही कार म्हणून वापरता येईल व पाण्यामध्ये अगदी ताशी ६० किलोमीटरपेक्षा जास्त वेगानेही मोटरबोटसारखी जाईल असे काही वाहन असेल ही कल्पना भारतात प्रथम आली असेल तरी जेम्स बॉण्डच्या चित्रपटांमधून.. ही अॅम्फिबियन कार मुळात साधारण १९६० च्या दशकात बहुधा तयार झाली त्यानंतर त्यात खूप काही सुधारणाही झाल्या. गिब्स स्पोर्टस अॅम्फिबियन्स या कंपनीने अॅक्वाडा नावाची एक अशीच उभयचर कार विकसित केली होती. आता त्या कारच्या नव्याकाळाप्रमाणे आणखीही नवे नवे प्रकार व नवनव्या सुधारणा झाल्या असतील. अन्य कंपन्यांनीही त्या प्रकारच्या कारचे उत्पादन केले असेल. याच कंपनीत काम करणारे आमचे मित्र श्री. भास्कर मराठे यांनी २०१० मध्ये त्यांच्या कंपनीने तयार केलेल्या अॅक्वाडा या आगळ्या मोटारीचा साधारण सात वर्षांपूर्वी अनुभव घेतला.
नेहमीच्या कार ड्रायव्हिंगपेक्षा या 'अॅक्वाडा'चा अनुभव एकदम वेगळा होता. या उभयचर 'अॅक्वाडा'ला एकूण तीन सीट्स असून मधील सीट ही ड्रायव्हरची आहे. त्याच्या उजव्या व डाव्या बाजूला प्रवासी बसू शकतात. ही छतविरहीत कार असून साधारण कार व मोटरबोट यांच्या रचनेचा सवोत्कृष्ट मिलाफ यामध्ये दिसतो. कार पाण्यात शिरताच तरंगू लागते व त्याचवेळी कारची चाके मुडपून म्हणजे फोल्ड करून घेण्यासाठी बटण दाबायचे. त्यानंतर कारचीच चाके कार आपल्या पोटात घेते... मग काय मोटरबोटप्रमाणे सुमारे ताशी ६५ किलोमीटर वेगाने ती धावू लागते. त्याचा हा अनुभव त्यावेळचा अतिशय आगळा होता. गतीला प्रथमच वेगळ्या स्तरावर अनुभूती देणारा होता.
त्यांच्याबरोबर या कंपनीत आरेखनकार असणाऱ्या त्यांच्या मित्राचे नाव योगायोगाने जेम्स बॉण्ड असे होते. विशेष म्हणजे इयान फ्लेमिंग यांनी जेम्स बॉण्ड हे पात्र आपल्याच नावावरून चोरले असल्याचा आरेखनकार जेम्स यांचा गोड आरोप होता, अशी आठवण मराठे सांगतात.
यातही गंमतीचा व लक्षणीय भाग असा की, 'गिब्स'ने ही 'अॅक्वाडा' कार निर्माण केली, त्याचे उत्पादन केले पण कार बाजारात त्यावेळी विकल्याच नाहीत. त्या 'अॅक्वाडा'चा वापर ब्रिटिश खाडीमध्ये व्हर्जिन अटलांटिक या कंपनीचे मालक रिचर्ड ब्रन्सन यांनी केला. २००३ मध्ये त्यावेळी ही 'अॅक्वाडा' या खाडीतून पार केली गेली.य आता गिब्स या अॅक्वाडा 'कलेक्टर्स पिसेस' म्हणून १ कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीला विकत आहे.