KIA ची 7 सीटर कार लॉंच; भारतातून केले ग्लोबल डेब्यू, मारुतीच्या अर्टिगाशी थेट टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 06:28 PM2021-12-16T18:28:44+5:302021-12-16T18:29:46+5:30
Seltos आणि Sonet प्रमाणे नवी कार गेमचेंजर ठरू शकते, असा विश्वास किआ मोटर्सकडून व्यक्त करण्यात आला आहे.
नवी दिल्ली: सेमीकंडक्टर चिपच्या कमतरतेमुळे ऑटोमोबाइल क्षेत्रासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. ग्राहकांची मागणी असतानाही या समस्येमुळे वाहनांचा पुरवठा दिलेल्या वेळेत करणे अनेक कंपन्यांना शक्य होत नाही. मात्र, तरीही कंपन्या आपली आकर्षक वाहने सादर करत आहेत. अल्पावधीतच भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या किआ मोटर्सने Kia Carens ही ७ सीटर कार लॉंच केली असून, भारतातून ग्लोबल डेब्यू केले आहे.
Kia Motors मोटर्सने दावा केला आहे की, Carens थ्री-रो सेगमेंट मध्ये सर्वात लांब व्हीलबेस सोबत येणार असून, यात इलेक्ट्रिक पॉवर फोल्डिंग सीट्स आणि एम्बिअँट मूड लायटिंग सारखे फर्स्ट इन क्लास सेगमेंट फीचर्स असतील. Carens पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिन ऑप्शन सोबत येईल. यासोबत यात थ्री ड्रायविंग मोड सुद्धा असेल.
Seltos आणि Sonet प्रमाणे गेमचेंजर ठरू शकेल
किआ मोटर्सची नवी ७ सीटर कार तीन कलर ऑप्शन इम्पिरियल ब्लू, मॉस ब्राउन आणि स्पार्कलिंग तसेच सिल्वर या रंगांच्या पर्यायात उपलब्ध होणार आहे. तसेच Seltos आणि Sonet प्रमाणे ही कार गेमचेंजर ठरू शकते, असा विश्वास कंपनीकडून व्यक्त करण्यात आला आहे. ८ स्पीकर बेस म्यूझिक सिस्टम, व्हेंटिलेटेड फ्रंट रो सीट्स, १०.२५ इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, स्मार्ट एअर प्यूरिफाइड सारखे जबरदस्त फीचर्स दिले जाणार आहेत.
भारत हा वैवीध्यपूर्ण आहे, आणि येथील लोकांचे प्राधान्य वेगवेगळे आहे. कॅरेन्स विकसित करत असताना आम्ही अनलॉक सुरक्षा आणि फिचर्स यावर अधिक भर दिला आहे. या कारचे डिझाइन उत्तम, आरामदायी आणि क्लासी आहे; या कारमध्ये एखाद्या आधुनिक भारतीय कुटूंबाला जे काही हवे असते ते सर्वकाही आहे. कॅरेन्स ही सर्वच पैलूने किआकडून असलेली आणखीन एक वास्तव ग्राहक केंद्रित कार आहे. या कारची रचना पूर्णपणे कुटुंबासाठी तयार करण्यात आली आहे, असे किआ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ टी-जिन पार्क यांनी सांगितले.
दरम्यान, या नवीन कारमध्ये ६ एअरबॅग दिले आहेत. लाँच झाल्यानंतर या कारची टक्कर मारुती आर्टिगा, मारुती एक्सएल६ आणि महिंद्रा मराजो सारख्या एमपीव्ही सोबत होईल.