Kinetic Luna Electric: 1972 ची लोकप्रिय मोपेड कायनेटिक लुना इलेक्ट्रिक अवतारात पुन्हा येणार, ऑटो एक्सपोमध्ये दिसण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 01:58 PM2022-12-27T13:58:16+5:302022-12-27T13:58:52+5:30
Kinetic Luna Electric: कंपनी हे मोपेड पेट्रोल इंजिनऐवजी इलेक्ट्रिक अवतारमध्ये लॉन्च करणार आहे. ज्याला कायनेटिक ई-लुना (Kinetic e-Luna) असे नाव दिले जाऊ शकते.
नवी दिल्ली : कायनेटिक ग्रुप (Kinetic Group ) लवकरच भारतीय बाजारपेठेत आपले लोकप्रिय मोपेड कायनेटिक लुना (Luna Electric) पुन्हा लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मात्र, यादरम्यान कंपनी हे मोपेड पेट्रोल इंजिनऐवजी इलेक्ट्रिक अवतारमध्ये लॉन्च करणार आहे. ज्याला कायनेटिक ई-लुना (Kinetic e-Luna) असे नाव दिले जाऊ शकते.
रिपोर्टनुसार, कायनेटिक इंजिनियरिंग लिमिटेडने (KEL) लुना इलेक्ट्रिकचे उत्पादन सुरू केले आहे, ज्यामध्ये त्याच्या चेसिस आणि इतर भागांचे उत्पादन देखील सुरू झाले आहे. याशिवाय, कायनेटिक ई-लुनाचे मेन चेसिस, डबल स्टँड, साइड स्टँड आणि हँडलबारसह अनेक महत्त्वाचे भाग कायनेटिकच्या उपविभागाद्वारे तयार केले जात आहेत. रिपोर्ट्सनुसार, कंपनीचे उद्दिष्ट दर महिन्याला 5,000 इलेक्ट्रिक लुनाचे उत्पादन करण्याचे आहे.
इलेक्ट्रिक लूनाबाबत कंपनीच्या नियोजनाविषयी बोलताना कायनेटिक इंजिनिअरिंग लिमिटेड (केईएल) चे व्यवस्थापकीय संचालक अजिंक्य फिरोदिया म्हणाले, "आम्ही आगामी 2-3 वर्षांत हा व्यवसाय वार्षिक 30 कोटी रुपयांनी वाढण्याची अपेक्षा करतो आणि याचे कारण इलेक्ट्रिक लुनाच्या संख्येत वाढ झाली आहे. या इलेक्ट्रिक लुनाच्या माध्यमातून कंपनीला इलेक्ट्रिक व्हेईकल सेगमेंटमध्ये आपली मजबूत उपस्थिती नोंदवण्यास मदत मिळेल."
याचबरोबर, अजिंक्य फिरोदिया यांनी पेट्रोल इंजिनसह येणाऱ्या लुनाच्या विक्रीबद्दल सांगितले की, आपल्या काळात कंपनी सर्वाधिक लुना विकत असे, जे दररोज 2 हजार युनिट्सपेक्षा जास्त होते. आम्हाला खात्री आहे की ई-लुना आपल्या इलेक्ट्रिक अवतारात आणखी चांगली कामगिरी करेल.
Kinetic Group ने कधी आणली होती लुना दुचाकी
कायनेटिक ग्रुपने 1972 मध्ये लॉन्च केलेली, लुना ही भारतातील सर्वात कमी कालावधीत सर्वाधिक मागणी असलेली दुचाकी बनली. पण 2000 मध्ये तब्बल 28 वर्षांनंतर कंपनीने कायनेटिक लुनाचे उत्पादन बंद केले होते. त्यावेळी कंपनीने या मोपेडमध्ये 50 सीसीचे इंजिन दिले होते.
Kinetic E Luna कधी होणार लॉन्च?
या ई-लुनाच्या लाँचिंगपासून ते राइडिंग रेंज, बॅटरी पॅक, टॉप स्पीड, फीचर्स आणि किमतीबाबत कायनेटिक ग्रुपने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण रिपोर्ट्सनुसार, कंपनी 2023 ऑटो एक्सपोमध्ये इलेक्ट्रिक लुनाचे सॅम्पल मॉडेल सादर करू शकते.