बजाजकडून पूरग्रस्तांना मोठा दिलासा; दुचाक्या मोफत दुरूस्त करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 07:01 PM2019-08-19T19:01:32+5:302019-08-19T19:03:45+5:30
पूरग्रस्त गाड्यांचा आकडा समोर आलेला नसला तरीही हा आकडा लाखाच्या आसपास असण्याची शक्यता आहे.
सांगली, कोल्हापूर, मुंबई आदी भाग गेल्या आठवड्यात पाण्याखाली गेले होते. मोठ्या पुराच्या पाण्यामुळे गाड्या नादुरुस्त झाल्या आहेत. या गाड्यांचा आकडा समोर आलेला नसला तरीही हा आकडा लाखाच्या आसपास असण्याची शक्यता आहे. यामध्ये बजाजच्या गाड्यांचीही संख्या मोठी आहे. प्लॅटिना, पल्सर, डिस्कव्हर अशा बजाजच्या दुचाकींमध्ये पाणी गेले आहे.
बजाजकडून सामाजिक बांधिलकी म्हणून या पूरग्रस्त भागात 19 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीत मोफत दुरुस्ती कॅम्प सुरू करण्यात येणार आहेत. हे कॅम्प महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि केरळमध्ये सुरू होतील. यासाठी बजाजने त्यांच्या डीलरना सूचना दिल्या आहेत.
या राज्यांमधील पूरग्रस्त नागरिक त्यांच्या बाईक घेऊन जवळच्या डीलरकडे जावे लागणार आहे. पूरग्रस्त बाईकची पूर्ण तपासणी केली जाणार आहे. यानंतर इंजिनमधील पाणीही काढून दिले जाईल. ही सेवा मोफत असणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार पूरग्रस्त मोटारसायकलची तपासणी, ऑईल बदलणे, इंजिन ऑईल, ऑईल फिल्टर, एअर फिल्टर आणि गॅस्केट आदींचा एकही पैसा द्यावा लागणार नाही. हे सर्व मोफत बदलून दिले जाणार आहे.
बजाज ऑटोचे मोटारसायकल व्यवसायाचे अध्यक्ष सरोज कनाडे यांनी सांगितले की, पुरामुळे हजारो लोकांचे जीवन प्रभावित झाले आहे. त्यांना पोटापाण्याची, रोजगाराची चिंता आहे. यामुळे अशा प्रसंगात आम्ही ग्राहकांसोबत उभे राहणार आहोत. डीलरनी लवकरात लवकर ग्राहकांच्या मोटारसायकली दुरुस्त करून त्यांना परत कराव्यात.